रंगपंचमीसाठी रहाड खोदकामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 05:54 PM2019-03-22T17:54:17+5:302019-03-22T17:54:46+5:30
नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास ...
नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. नैसर्गिक रंगाने आणि फुलांच्या सजावटीने भरलेल्या रहाडीत रंगखेळण्याच्या या उत्सवात नाशिककर आवर्जून सहभागी होतात. येत्या सोमवारी रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी आतापासून रहाडींच्या खोदकाला सुरुवात झाली आहे.
जूने नाशिकसह पंचवटी परिसरातील रहाडींवर रंग खेळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. सरदार चौक, तिवंधा लेन, दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात रंगपंचमी खेळली जाते. वीस ते पंचवीस फूट लांबी-रुंदी आणि पाच ते सहा फूट खोल अशी पुरातन रहाडीची रचना आहे. या रहाडीमध्ये नैसर्गिक रंगाने रंग तयार करून विधीवित पूजा झाल्यानंतर या रहाडीत उड्या घेतल्या जातात. काहींना यात आणून टाकले जाते. एकमेकांना राहडी ओढून त्यांना रंगाने चिंब भिजविले जाते.
अत्यंत जुन्या अशा या दगडी रहाडी असून काहींचा शोध अलीकडेच लागला आहे. दरवर्षी रंगपंचमी आली की या रहाडी पुन्हा खुल्या केल्या जातात. रहाडीवरील मातीकाम आणि त्याखालील फळ्या काढल्यानंतर रहाड दृष्टीस पडते. शहरातील अशा रहाडींच्या खोदकामाला शुक्रवारी प्रारंभ झाला. रहाड खोदण्यापूर्वी देखील विधीवत पूजा करून खोदकामाला सुरुवात होते. नाशिकची रंगपंचमी म्हटली की पंचवटी, जुने नाशिकमधील रहाडींची रंगोत्सव सर्वांनाच आठवतो. पारंपरिक पद्धतीने या रहाडींमध्ये रंगाचा सण सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. या उत्सवासाठी दरवर्षी परिसरातील कार्यकर्ते मागीलवर्षी बुजविलेली रहाड खोदण्याचा कामाला सुरुवात करतात.त्यानुसार अशा रहाडी खोदकाम करण्यास प्रारंभ झालेला आहे.