भद्रकाली पोलिसांकडून नगरसेवक शेलारांच्या चौकशीचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 10:59 PM2017-09-09T22:59:47+5:302017-09-09T23:01:01+5:30
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़९) सुमारे पन्नास पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुयोग्य पद्धतीने केला़ शेलार यांच्या पुतण्याला अटक करण्याची तत्परता दाखविणाºया भदक्राली पोलिसांना नामको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गाजविणाºया गजानन शेलारांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक व सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नगरसेवक शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला़ शेलार यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून, त्यावर सोमवारी (दि़११) निर्णय होणार असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडे न्यायालयातील अर्जाची मागणी करण्यात आली़ मात्र, त्यांच्याकडे ती नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ या ठिकाणी त्यांच्या वकिलांनी कॉपी आणून दिल्यानंतर सुमारे अडीच तासांनी त्यांची सुटका करण्यात आली़
गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी (दि़५) डीजे लावून ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्या प्रकरणी काजीपुरा चौकातील दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक गजानन शेलार, मंडळाचे पदाधिकारी राहुल उर्फ बबलू शांताराम शेलार (रा. बागवानपुरा), खजिनदार योगेश जवाहरलाल मदरेले (रा. चौक मंडई), उपखजिनदार अक्षद अनिल कमोद (रा. कमोद गल्ली) आणि डीजेचालक गणेश हिरामण तोरे (रा. वैद्यनगर) यांच्यावर भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाा़ यापैकी नगरसेवक शेलार वगळता उर्वरित चौघांना अटक भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती़
न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात या चौघांना अटक केली होती़ दरम्यान, शेलार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायालय काय निर्णय देत याकडे नागरिक व पोलिसांचे लक्ष लागले आहे़