नाशिकच्या घोटी नरबळी प्रकरणातील अकरा आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:46 PM2017-12-05T23:46:58+5:302017-12-06T00:05:46+5:30
भुताळीण असल्याच्या कारणावरून बुधीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (मोखाडा) दोन सख्ख्या बहिणींना लाथा-बुक्क्यांनी तुडवून ठार मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील नरबळी प्रकरणातील ११ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा-२०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़
नाशिक : भुताळीण असल्याच्या कारणावरून बुधीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (मोखाडा) दोन सख्ख्या बहिणींना लाथा-बुक्क्यांनी तुडवून ठार मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील नरबळी प्रकरणातील ११ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा-२०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़ आॅक्टोबर २०१४ मध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपींमध्ये अंधश्रद्धेपायी स्वत:च्या आईचा जीव घेणा-या दोन सख्ख्या भावांचाही समावेश असून, इतर आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत़
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथे ३० आॅक्टोबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास अंगात देवाची हवा येत असल्याचे सांगत दरबार भरविणाºया आरोपी बच्चीबाई खडके व बुग्गीबाई वीर यांनी बुधीबाई दोरे व तिची बहीण काशीबाई वीर या दोघी भुताळीण असून, त्यांना बुधीबाईची मुलगी राहीबाई हिरामण पिंगळे (दांडवळ, ता़ मोखाडा, जि़ पालघर) हीची साथ आहे़ या तिघींमुळेच सनीबाई निरगुडे हीस मूलबाळ होत नसून या तिघींनाही या तिघींमधील भुताळणीला बाहेर काढण्यासाठी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सांगितले़ यानंतर अंगात देवाची हवा असलेल्या या दोघींसह सर्व आरोपींनी अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडाने जबर मारहाण केली़ यामध्ये राहीबाई कशीतरी स्वत:ची सुटका करून पळाली, तर बुधीबाई व काशीबाई या दोघींचा मृत्यू झाला़
बुधीबाई व काशीबाई यांचे मृतदेह आरोपींनी डहाळेवाडी येथील सोमा मंगा निरगुडे डहाळेवाडी याच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर स्वत:चा जीव वाचवून पळालेल्या राहीबाईला पोलिसांना माहिती दिल्यास जीभ छाटून टाकण्याची तसेच जिवे ठार मारून मृतदेहाचे तुकडे वाळत टाकण्याची धमकी दिली़ या घटनेनंतर गावामध्ये दोन महिलांचा नरबळी दिल्याची अफवा पसरली़ या अफवांवरून श्रमजिवी संस्थेचे सचिव भगवान मधे यांनी चौकशी केली व राहीबाईला विश्वासात घेऊन घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितली़ यानंतर पोलीस ठाण्यात राज्यातील पहिला महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़
तब्बल दोन महिन्यांनी दाखल झालेल्या या गुन्ह्यात आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी पुरलेले मृतदेह दाखविले़ या दोन्ही मृतदेहांची फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ़ आनंद पवार व तहसील यांच्यासमोर मृतदेह उकरून तपासणी करण्यात आली़ यामध्ये व्हर्टीकल फ्रॅक्चरमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल डॉ़ पवार व डॉ़ गायधनी यांनी दिला़ तसेच मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीदेखील करण्यात आली होती़ विशेष म्हणजे आईच्या मृत्यूनंतर आरोपी गोविंद मोरे याने आईच्या मृत्युपत्रासाठी अर्जही केला होता़ या अर्जावरील हस्ताक्षरावरून त्याचा सहभाग असल्याचे न्यायालयासमोर आले़
नरबळीच्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी सी़ एस़ देवराज यांनी केला होता़ न्यायालयात सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी २७ साक्षीदार तपासले तर अंतिम युक्तिवाद हा अॅड़ दीपशिखा भिडे यांनी केला़ न्यायालयाने पीडित राहीबाई पिंगळे, फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ़ आनंद पवार, डॉ़ गायधनी यांची साक्ष तसेच परिस्थितीजन्म पुरावे महत्त्वाचे ठरले़
या कायद्यान्वये शिक्षा
न्यायाधीश नंदेश्वर यांनी अकराही आरोपींना खून (३०२), जिवे ठार मारण्याचा प्रयत्न (३०७), पुरावा नष्ट करणे (२०१), धमकावणे (५०६) व महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या ३ चा कलम (२) अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व पीडित राहीबाई पिंगळे हीस एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला़
या आरोपींना जन्मठेप
बच्चीबाई नारायण खडके (४२), लक्ष्मण बुधा निरगुडे (३०), नारायण शिवा खडके (४२), वामन हनुमंता निरगुडे (४०), किसन बुधा निरगुडे (३९), हरी बुधा निरगुडे (३०), सनीबाई बुधा निरगुडे (६५, सर्व राहणार टाके हर्ष, ता़ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), बुग्गीबाई महादू वीर (३५) व महादू कृष्णा वीर (४०, दोघेही रा़ नासेरा विरवाडी, ता़ मोखाडा, जि़ पालघर) गोविंद पुनाजी दोरे (३१), काशीनाथ पुनाजी दोरे (३१ रा़दोघेही दांडवळ, ता़मोखाडा, जि़पालघऱ)
२७ साक्षीदार तपासले
काळी जादू, पैशांचा पाऊस अशा अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्यासारखे प्रकार आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये होतात़ या अनिष्ट गोष्टी थांबविण्यासाठी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायदा तयार करण्यात आला़ या खटल्याचे २७ साक्षीदार मी तपासले होते व त्यांना झालेली जन्मठेप ही राज्यातील पहिलीच शिक्षा आहे़ या शिक्षेमुळे समाजातील अंधश्रद्धा तसेच अनिष्ट प्रथांना पायबंद बसेल तसेच शिक्षा झाल्यामुळे हे प्रकार थांबतील़
- अॅड़ पौर्णिमा नाईक, विधी निदेशक, महाराष्ट्र पोलीस अकदामी, नाशिक़
क्रूरतेने घेतला बळी
भुताळीण असल्याच्या अंधश्रद्धेपायी अकरा आरोपी अक्षरश: दोन महिलांच्या अंगावर नाचले व अतिशय क्रूरतेने त्यांनी बळी घेतला़ अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक संस्था व संघटना काम करीत असताना समाजात अजूनही असे प्रकार सुरू आहेत़ या खटल्याच्या अंतिम युक्तिवादात आरोपींचा क्रूरता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली़ परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार यांच्यामुळे दोष सिद्ध झाले व जन्मठेपेची शिक्षा मिळाली़ या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या अघोरी प्रकारांना नक्कीच आळा बसेल़
- अॅड़ दीपशिखा भिडे, सरकारी वकील, नाशिक
न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचे स्वागत
न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचे अंनिस स्वागत करीत असून पोलीस व सरकारी वकिलांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे़ डॉ़ नरेंद दाभोलकर यांनी अंनिसच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे जादूटोणा कायदा झाला़ या कायद्यात फाशीची तरतूद नसली तरी दोन महिलांचे गेलेले जीव व पुरावे यानुसार न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ या घटनेनंतर कृष्णा चांदगुडे व मी घटनास्थळी भेट दिली होती़ आदिवासीबहुल क्षेत्रात अशा जीवघेण्या अघोरी प्रथा असून, या शिक्षेमुळे या प्रकारांना नक्कीच आळा बसेल़ प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे़
- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
३०० दिवसांत १०० शिक्षा
जादूटोणा कायद्यान्वये झालेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा असून, ग्रामीण भागातील अशिक्षितपणाचा फायदा घेऊन अघोरी व क्रूर कृत्य करणाºयांना यामुळे जरब बसेल़ जिल्हा सरकारी वकील पदाची सूत्रे घेतल्यापासून जिल्ह्यातील विविध न्यायालयांत सुरू असलेल्या खटल्यांमध्ये मी व माझ्या सहकारी वकिलांनी ३०० दिवसांत लहान-मोठ्या प्रकारच्या शंभर दोषी आरोपींना शिक्षा देण्यात यशस्वी झालो आहोत़
- अॅड़ अजय मिसर, जिल्हा सरकारी वकील, नाशिक (फोटो : - आर / फोटो / ०५ अजय मिसर या नावाने सेव्ह केला आहे़)