वर्षभरात एसटी ने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 04:25 PM2018-01-10T16:25:41+5:302018-01-10T16:30:34+5:30
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावरही महामंडळाला खर्च करावा लागत आहे.
अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. नाशिक विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५६४ रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. तर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील अपघात भरपाई महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बिघडविणारी असल्याने अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.
वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारी
सुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला केवळ नुकसानभरपाईपोटी कोट्यावधी रुपये द्यावे लागतात. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा पाहिला तर विभागाचे दोन दिवसाचे उत्पन्नही एवढे होत नाही. त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई द्यावी लागते. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग