विजेच्या यंत्रापासून दूर साजरी करा होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:46 PM2019-03-18T16:46:46+5:302019-03-18T16:46:53+5:30
नाशिक : होळी , धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून ...
नाशिक : होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. विजेच्या यंत्रणेजवळ आग, पाणी यांचा संपर्क आल्यास दुर्घटना घडू शकते ही शक्यता गृहित धरून अशा प्रकारच्या सणाच्या काळात अपघाताचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.
सणाच्या काळात उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे बालगोपाळांनी काळजी आणि दक्षता घेण्याबरोबरच पालकांनीदेखील आपल्या पाल्यांच्या खेळण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यांना धोक्याची कल्पना देण्याच्यादृष्टीने महावितरणने विजेच्या संभाव्य धोक्याबाबत ग्राहकांना आवाहन केले आहे.
रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी, रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकताना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरात होळी खेळताना वीजमीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा, ओल्या हाताने या वस्तू हाताळू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटवितानादेखील दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. जेथे होळी पेटवायची आहे तेथे सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत ना याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडणे व यातून अपघाताचा धोका संभवतो.