सौभाग्य मधून उजळणार जिल्ह्यातील ५८ हजार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:25 PM2018-01-30T18:25:10+5:302018-01-30T18:28:32+5:30
नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उदिठ्ये ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्रय रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्रय रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील ४ कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचिवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून त्यासाठी १६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगारांच्या संधी वाढण्यासोबतच स्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
नाशिक परिमंडळात कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता, सुनील पावडे यांच्या हस्ते नुकताच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते सुरगाणा तालुक्यातील आदिवासीबहुल हनुमंतमाळ व सुभाषनगर येथील विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. पहिल्यांदाच घरात वीज आल्याने लाभार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह व आनंद होता. यावेळी नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता अनंत झोले, सहाय्यक अभियंता एन. आर. भोर, व्ही. टी. वाझे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील ५८ हजार कुटुंबियांना सौभाग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील दारिद्र्य रेषेखालील २५ हजार कुटुंबियांना विनाशुल्क तर दारिद्रय रेषेच्या वरील ३३ हजार कुटुंबियांना नाममात्र शुल्क भरून वीजजोडणी मिळविता येणार आहे.