नाशिकरोड कारागृहातील बंदीवान्याने केला महिला उपनिरीक्षकाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:04 PM2018-08-09T14:04:08+5:302018-08-09T14:06:23+5:30
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ उमेश भानुदास नागरे (२१, बंदी क्रमांक सी-11486, मूळ रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर) असे या संशयिताचे नाव आहे.

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि़७) सकाळी बंदीवान नागरे याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी नाशिकरोड कारागृहात आले होते़ नागरे हा बेकायदेशीरित्या नातेवाईकांना मुलाखत कक्षाजवळ भेटत असल्याचे त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षकाच्या लक्षात आले़ त्यामुळे त्यांनी बंदीवान नागरे यास बेकायदेशीररित्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाकारली़
यामुळे संतप्त झालेल्या नागरे याने महिला उपनिरीक्षकास मुलाखत कक्षाच्या पायरीवरून ढकलून देण्याची धमकी देत विनयभंग केला़ तसेच अश्लिल भाषेत लैंगिक शेरेबाजी करून शासकीय कामात अडथळा आणला़ या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. राऊत यांनी कारागृहात भेट दिली़
या प्रकरणी बंदीवान नागरेविरोधात विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणणे व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.