लॉकडाऊनमध्ये १९ हजार दाखले वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 PM2021-06-10T16:09:32+5:302021-06-10T16:12:22+5:30
ऑनलाइन प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे १३ दाखले वितरित केले जातात. शेतीविषयक प्रकरणे तसेच शैक्षणिक कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता असते. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जंवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करून अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीनेच दाखले वितरित केले जातात.
नाशिक : शैक्षणिक तसेच शेतीविषयक कामासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले लॉकडाऊनच्या काळातही मोठ्या प्रमाणात वितरित झाले आहेत. एप्रिल ते मे या कालावधीत अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने दाखले प्राप्तदेखील झाले असून यामध्ये सर्वाधिक १३ हजार हे उत्पन्नाचे तर अडीच हजार जातीच्या दाखल्यांचा समावेश आहे.
ऑनलाइन प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे १३ दाखले वितरित केले जातात. शेतीविषयक प्रकरणे तसेच शैक्षणिक कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता असते. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जंवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करून अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीनेच दाखले वितरित केले जातात. कोरोनाच्या प्रभावामुळे एप्रिल आणि मे दोन महिन्यांत सर्वत्र कामकाज ठप्प होते. त्यामुळे अर्जांची संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या अर्जांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
डोमेसाईल, ॲग्रीकल्चर, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, भूमिहीन मजूर, नॉन क्रिमिलेअर, सिनिअर सिटिझन, अल्पभूधारक, तात्पुरता रहिवासी दाखला, ३० टक्के महिला आरक्षण अशा प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने वितरित केले जातात. गेल्या महिनाभरात सुमारे २३,०७७ इतके अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी १९,२५१ प्रकरणे हे मंजूर करण्यात आले आहेत, तर २०९ प्रकरणे रद्द करण्यात आली. उर्वरित तीन ते साडेतीन हजार प्रकरणांवरील कामकाज सुरू असून जूनच्या मध्यापर्यंत दाखल अर्जांपैकी दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे.
शैक्षणिक तसेच कर्जविषयक कामासाठी जातीचा दाखला तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची महत्त्वपूर्ण गरज असते. उच्चशिक्षण तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया या कालावधीत सुरू असल्याने दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल झाली होती. त्यानुसार प्राधान्याने दाखले वितरित करण्यात आलेली आहेत. अर्जदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे दाखले वितरित करण्यात आलेले आहेत.