वंचित आघाडीच्या ‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:59 PM2020-01-24T16:59:57+5:302020-01-24T17:00:49+5:30
नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘ नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, ...
नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, गंजमाळ आणि शालिमारला व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील दुकानदार व वेगवेगळ्या व्यावसायिकांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक शहर व जिल्हा शाखेने केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आल्यानंतर नाशिकरोडला कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरातदेखील अभिवादनानंतर शालिमार चौक तसेच शिवाजीरोड परिसरातदेखील दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढली.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कार्यकर्त्यांना पोेलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते. नाशिकरोड, द्वारका, गंजमाळ, सातपूर, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.