नगरसेवक शेलार यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:55 PM2017-09-08T22:55:24+5:302017-09-08T23:04:32+5:30
नाशिक : सार्वत्रिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी (दि़ ८) युक्तिवाद झाला़ या जामीन अर्जावर न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे़ दरम्यान, दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी बबलू शेलार यांचा न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला असून, भद्रकाली पोलिसांनंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे़
शहरातील सार्वत्रिक गणेशोत्सव मिरवणुकीत नगरसेवक गजानन शेलार संस्थापक अध्यक्ष असलेल्या दंडे हनुमान मित्रमंडळाने सर्वोच्च न्यायालय व पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केले़ या प्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणी बबलू शेलार यांना भद्रकाली पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला़ यानंतर सरकारवाडा पोलिसांनी अटक केली़
दरम्यान, या प्रकरणी नगरसेवक गजानन शेलार यांच्यावरही गुन्हा दाखल असून, त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता़ यावर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला व त्यावर सोमवारी (दि़ ११) निर्णय होणार आहे़