राष्ट्रीय लोकअदालतीत २७ हजार दावे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:15 PM2018-07-14T23:15:10+5:302018-07-14T23:16:23+5:30
नाशिक : जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१४) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या आवाहनाला पक्षकारांनी प्रतिसाद देत २७ हजार ४७ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला आहे़ यामध्ये दावा दाखलपूर्व २५ हजार ८१ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९६६ प्रकरणांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत १४ कोटी ३३ लाख रुपयांच्या तडजोड रकमेची वसुली झाली
नाशिक : जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१४) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या आवाहनाला पक्षकारांनी प्रतिसाद देत २७ हजार ४७ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला आहे़ यामध्ये दावा दाखलपूर्व २५ हजार ८१ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९६६ प्रकरणांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत १४ कोटी ३३ लाख रुपयांच्या तडजोड रकमेची वसुली झाली आहे़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी गत जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांच्या संमतीने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले़ वर्षानुवर्षांपासून न्यायालयात खेटा मारणाऱ्या पक्षकारांना आपसात समझोता करण्यासाठी लोकअदालतीच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांना त्यांनी भेटीही दिल्या होत्या़
शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी सात हजार ५०७ प्रकरणे, तर दावा दाखल पूर्व एक लाख २१ हजार ६८६ प्रकरणे ठेवण्यात आली होती़ प्रलंबित प्रकरणांमध्ये एक हजार ९६६, तर दावा दाखल पूर्व प्रकरणांमध्ये २५ हजार ८१ अशा एकूण २७ हजार ४७ प्रकरणांचा निपटारा झाला़ दावा दाखल प्रकरणांमध्ये पाच कोटी आठ लाख ६६ हजार ८९६ रुपये, मोटार अपघात प्रकरणांमध्ये आठ कोटी २८ लाख ६६ हजार २३६ रुपये, एनआय अॅक्टमध्ये चार कोटी ५८ लाख ७६ हजार ७६३ असे १४ कोटी ३३ लाख आठ हजार ८८४ रुपयांची नुकसानभरपाई व दंडापोटी वसूल करण्यात आली आहे़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुक्के, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांचे परिश्रम तसेच वकील व पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीत सत्तावीस हजार दावे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़
राष्ट्रीय लोकअदालत ही सुवर्णसंधी
न्यायासाठी वर्षानुवर्षे तिष्ठत बसलेल्यांसाठी राष्ट्रीय लोकअदालत ही सुवर्णसंधी असून, पक्षकारांनी याचा लाभ घेतला आहे़ यापुढील लोकअदालतींनाही पक्षकारांना चांगला प्रतिसाद दिल्यास न्यायालयावरील ताण कमी होईलच शिवाय न्यायही झटपट मिळेल़ न्यायाधीश, वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच नाशिक जिल्हा न्यायालयाने २७ हजार दावे निकाली काढण्यात यश मिळविले असून, हा एक इतिहासच आहे़
- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक