कसारा रेल्वेमार्गावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 06:25 PM2019-08-04T18:25:48+5:302019-08-04T18:26:26+5:30
नाशिक : मुसळधार पावसामुळे रस्ते मार्गावर दरड कोसळल्यानंतर दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कसारा घाटातील रेल्वे मार्गावरदेखील ...
नाशिक : मुसळधार पावसामुळे रस्ते मार्गावर दरड कोसळल्यानंतर दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कसारा घाटातील रेल्वे मार्गावरदेखील दरड कोसळल्यामुळे इगतपुरीहून मनमाडकडे निघालेल्या रेल्वे गाड्या या कसारा स्थानकात थांबविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दरड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, पावसाचा जोर कायम असल्याने कामात व्यत्यय निर्माण होत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडलेली असतानाच दरड कोसळल्यामुळे सेवा पूर्ववत सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबईकडे निघालेली दुरांतो एक्स्प्रेस ही सुमारे पाच तासांपेक्षा अधिक काळ इगतपुरी स्थानकात थांबविण्यात आल्यानंतर दरड कोसळल्यामुळे या गाडीच्या परतीचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे गाडीला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. सिंहगड एक्स्प्रेस कसारामार्गे वळविण्यात आलेली होती. परंतु दरड कोसळल्यामुळे सदर गाडी ही कसारा स्थानकातच थांबविण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यत काम सुरू असल्याने या मार्गावरून गाड्या सुरू होण्यास आणखी तीन तासांचा विलंब होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या आणखी तीन गाड्या मनमाडहूनच रद्द करण्यात आलेल्या आहेत. गाड्यांना विलंब होत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकातच अडकून पडावे लागले आहे. तर दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेसमधील प्रवासी गाडीतच अडकून पडले आहेत. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने दरड दूर करण्याच्या कामाला गती देण्यात आली.