सराईत गुन्हेगाराकडून कोयते जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:33 PM2017-09-04T23:33:35+5:302017-09-04T23:36:02+5:30
नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला मात्र जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा लावून अटक केली आहे़ सागर सुदाम दिघोळे (२६, रा़ धु्रवनगर, कार्बन नाका, सातपूर, मूळ रा़ जयेश किराणा दुकानाजवळ, मोरेमळा, पंचवटी) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत़
सराईत गुन्हेगार सागर दिघोळे हा थत्तेनगर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दिलीप मोंढे यांना मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दिघोळे यास अॅक्सेस दुचाकीसह (एमएच १५, एफजी ५९७८) ताब्यात घेतले़ त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २२ इंच लांबीचे दोन कोयते व सायकलची चेन आढळून आली़ त्याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दिघोळे हा सराईत गुन्हेगार असून पंचवटीतील खून प्रकरणात त्यास जन्मठेपेची शिक्षा झालेली असून, सद्यस्थितीत तो जामिनावर बाहेर आहे़ याखेरीज त्याच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन व गंगापूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे़ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहायक पोलीस निरीक्षक एऩ मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, संजय पाठक, जाकिर शेख, वसंत पांडव, संजय मुळक, रवींद्र बागुल, बाळासाहेब दोंदे यांनी ही कामगिरी केली़