कोरोनामुळे दगावलेल्यांच्या मृतदेहांची तपासणी न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 02:47 PM2020-04-08T14:47:43+5:302020-04-08T14:49:01+5:30
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावना व मृतदेहाची तपासणी करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता ...
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावना व मृतदेहाची तपासणी करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता पाहता यापुढे मृत व्यक्तीची तपासणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यासंदर्भात बुधवारी गृह खात्याने आदेश जारी केले असून, त्यामुळे पोलीस व आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येणेदेखील धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत रुग्ण उपचाराअंती दगावला तर कायद्याने त्याच्या मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा म्हणजेच मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून त्याच्या मृत्यूचे कारण नमूद करणे फौजदारी कायदा कलम १७७ नुसार बंधनकारक करण्यात आले आहे. गुन्हेगारी कृत्यात अशी तपासणी आवश्यक असली तरी कोरोनासारख्या संसर्गरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करणे पोलीस, डॉक्टर व नर्स यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते, तशी तक्रार पोलीस, आरोग्य यंत्रणेने केली होती. त्याची दखल घेऊन यापुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीची तपासणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सदरचा आदेश हा फक्त साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत लागू असणार आहे.