नाशिकमधूही होतेय कृत्रिम पावसाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:24 PM2019-07-15T16:24:22+5:302019-07-15T16:25:20+5:30
नाशिक : राज्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने कृत्रिम ...
नाशिक: राज्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने कृत्रिम पावसासाठी आर्थिक तरतूद यापूर्वीच केलेली आहे. आता राज्यातील अनेक भागातून कृत्रिम पावसाची मागणी होऊ लागली असून नाशिकमधून देखील दोन आमदारांनी पालकमंत्र्यांकडे कृत्रिम पावसाची मागणी केली आहे. नाशिकमधील अनेक तालुक्यांवर अजूनही पावसाची कृपा नसल्याने काही तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
राज्यात २०१५ मध्ये पावसाची परिस्थिती आजच्या सारखीच होती. त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. आता यावर्षी राज्यातील अनेक भागातून कृत्रिम पावसाची मागणी होऊ लागली असून या संदर्भात आगामी पावसाचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासाठी साधारण जुलै अखेरपर्यंत पावसाची वाट पाहिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कृत्रिम पावसाबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो असे सुत्रांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी बागलाणच्या आमदार दिपीका चव्हाण आणि नांदगावचे आमदार पंकज भुबजळ यांनी देखील कृत्रिम पावसाची मागणी अधोरेखीत केली. पावसाळा सुरू होऊन दिड महिन्यांपेक्षा अधिक कालावदी होऊनही पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात पेरण्यांची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.