आसारामबापूंच्या भक्तांना रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:59 PM2018-04-25T22:59:34+5:302018-04-25T22:59:34+5:30

स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता.

nashik,devotees,asaramapu,criedb,followars | आसारामबापूंच्या भक्तांना रडू कोसळले

आसारामबापूंच्या भक्तांना रडू कोसळले

Next
ठळक मुद्देआश्रमात  हवन : सकाळी ६ वाजेपासून भक्तांचा आश्रमात जपसकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे

नाशिक : स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता. दुपारनंतर बापूंच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाविकांचा आक्रोश अधिकच वाढला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने आसारामबापू यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूर कारागृहात विशेष न्यायालय स्थापन करण्यात येऊन आसारामबापू यांच्यासह अन्य तिघांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असल्यामुळे पहाटेपासून भाविकांनी येथील आश्रमात गर्दी गेली होती. सकाळपासून याठिकाणी भाविकांनी होमहवन आणि जपतप सुरू केले होते.
न्यायालयाने बापूंना दोषी ठरविल्यानंतर भाविकांना अश्रू आवरणे कठिण झाले. तरीही यावर विश्वास न ठेवता अहमदाबाद येथील मुख्य आश्रमातून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आश्रमाच्या संचालकांकडून भाविकांना करण्यात येत होते. निकाल काहीही लागला तरी भाविकांनी संयम राखावा, कुणीही रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन भाविकांना केले जात होते. परंतु भाविकांची मानसिकता लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले.
सकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे येत होते. सकाळी सुरू झालेले पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम दुपारपर्यंत अव्याहत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयाकडेदेखील सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रसारमाध्यमांपेक्षाही अहमदाबाद येथील आश्रमाकडून येणाऱ्या निवेदनावरच विश्वास असल्याची भूमिका भाविकांनी घेतल्याने आश्रमाच्या निवेदनाकडे त्यांचे लक्ष होते. मात्र निकालाची माहिती मिळाल्यानंतर भाविकांना रडू कोसळले.
दरम्यान, आश्रमात मात्र प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात येऊन कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई करण्यात आली होती. भाविकांच्या भावना तीव्र असल्याने माध्यमांनी दूर राहण्याचा सल्ला आश्रमाच्या संचालकांकडून दिला जात होता.

 

Web Title: nashik,devotees,asaramapu,criedb,followars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.