नाशिक जिल्ह्याच्या पेठ, दिंडोरी तालुक्यातील सराईत घरफोड्यांच्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:47 PM2018-08-01T18:47:04+5:302018-08-01T18:53:41+5:30
नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते़ या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घरफोडीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़
निरीक्षक करपे यांनी माहिती घेतली असता काही संशयित दिंडोरी तालुक्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव शिवारात मंगळवारी (दि़३१) रात्री सापळा रचून संशयित हरिदास बाळू निसाळ (२७), गणेश बाळू निसाळ (१९), कार्तिक नाना भोये (२०), राजू सुदाम निसाळ (२०, सर्व राहणार नाळेगाव ता. दिंडोरी) या चौघांना अटक केली तर श्रावण रामदास वाघमारे (२५) हा फरार आहे़
या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ, दिंडोरी, गिरणारे परिसरात घरफोड्या तसेच नाशिक शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ या संशयितांकडून विविध कंपन्यांचे ८३ मोबाईल फोन, मोबाईल अॅक्सेसरी, होम थिएटर, रेडिमेड कपडे, डीव्हीआर मशीन, चोरी केलेली पल्सर दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर दुचाकी तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्राइवर, पक्कड, लोखंडी कटवनी असा एकूण दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, पोलीस हवालदार प्रकाश् तुपलोंढे, हनुमंत महाले, दीपक अहिरे, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पोलीस नाईक वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, महिला पोलीस नाईक योगिनी नाईकयांनी ही कामगिरी केली़
बलात्कारातील शिक्षा भोगलेला टोळीचा म्होरक्या
घरफोडी करणाऱ्या या टोळीचा म्होरक्या हरीदास बाळू निसाळ याच्यावर दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने दिलेली सात वर्षांची शिक्षा भागून तो बाहेर आला आहे़ या आरोपींकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़