जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 05:19 PM2018-07-03T17:19:39+5:302018-07-03T18:40:18+5:30
नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़
नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या अभियोग कक्षाचा दरवाजा फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त असतो तसेच सुटीच्या दिवशीही शिपायांची नेमणूक असते़ अशी परिस्थिती असतानाही न्यायालयात चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणवर अभियोग कक्ष असून, या ठिकाणी विधी सेवा संदर्भात कामे केली जातात़ जुन्या सीबीएसच्या अगदी भिंतीलगत ही इमारत असून, रविवारी (दि़१) दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या इमारतीतील कार्यालयाच्या दरवाजाला असलेला साखळदंड व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला़ यानंतर या कार्यालयातील दोन लॅपटॉप व एक हार्डडिस्क असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़
या प्रकरणी राजेंद्र महाले (रा. सर्व्हिस रेसिडेन्सी, जत्रा हॉटेलसमोर, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २४ तास पोलिसांचा बंदोबस्त असतो़ तसेच न्यायालयातील शिपायांची न्यायालयीन सुटीच्या दिवशीही नेमणूक केलेली असताना दिवसाढवळ्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून लॅपटॉप व हार्डडिस्क चोरून नेली जाते, हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा आहे़