नाशिक जिल्हा न्यायालयात कुरीयरद्वारे धान्य घोटाळ्यातील पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:19 PM2018-02-27T23:19:12+5:302018-02-27T23:22:36+5:30
नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़
नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़ विशेष म्हणजे आठ दिवसांपुर्वी न्यायालयात कुरीयरद्वारे आलेला हा बॉक्स मंगळवारी (दि़२७) जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांच्यासमोर न्यायालयात उघडण्यात आला असता त्यामध्ये रेशन धान्याचा काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसोबत दिले जाणारे चलन,बील यांचे मूळ प्रती या बॉक्समध्ये आहेत़ दरम्यान, उपविभागीय अधिकारी तथा तपास अधिकारी अतुल झेंडे यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशान्वये हा कागदपत्रांचा बॉक्स सोपविण्यात आला आहे़
वाडीव-हे रेशन घोटाळ्यात सुमारे १४ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन, अश्विन जैन व प्रकाश शेवाळे यांचा समावेश आहे़ दरम्यान, या घोटाळ्यातील मास्टरमाइंड जितूभाई ठक्कर या ठाणेस्थित संशयितास ग्रामीण पोलीस अद्यापही पकडू शकलेले नाहीत़ तर, नाशिकचे पोलीस मला अटक वा माझा शोध घेऊ शकत नाही माझे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत अशी धमकीही जितूभाईने पोलिसांना दिली होती़
जिल्हा न्यायालयात कुरीअरद्वारे आलेल्या हा सुमारे ३५ किलो वजनाचा बॉक्स मंगळवारी उघडण्यात आला़ त्यामध्ये रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रकसाठी लागणारे चलन, बील याची मूळ कागदपत्रे आहेत़ मोरारजी भिकुलाल मंत्री या ट्रान्सपोर्ट व्यवसायिक व त्यांचा मॅनेजर संजय रामकृष्ण गडाख तसेच पटेल यांची या बॉक्समधील मूळ बिलांवर नावे आहेत़ दरम्यान, मोक्कान्वये दाखल या गुन्ह्यांत उच्च न्यायालयाने संशयित घोरपडे बंधूंसह काही संशयितांना जामीन दिलेला आहे़ दरम्यान, जिल्हा न्यायालयात कुरीअरद्वारे या धान्य घोटाळ्यातील पुरावे बॉक्समध्ये येण्याची ही दुसरी घटना आहे़
राज्यातील सर्वात मोठा घोटाळा
नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेला हा धान्य घोटाळा सर्वांत मोठा असून, राज्यात प्रथमच धान्य घोटाळ्यात मोक्कासारख्या कलमाचा वापर करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम ९ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यातील आठ जणांना मॅटकडून क्लिन चिट मिळाली. धान्य वाहतूक ठेकेदार, धान्य दुकानदार, पुरवठा खात्यातील अधिकाºयांची चौकशी करण्यात आली़ तसेच या गुन्ह्यात अॅड़ अजय मिसर यांनी सर्वात मोठे असे ५ हजार ७८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून यामध्ये १४ आरोपी, तर ६०२ साक्षीदार आहेत़