वृद्धाश्रमातील वृद्धांना कायद्याचे ज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 09:21 PM2017-08-07T21:21:51+5:302017-08-07T21:25:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कष्ट करणाºया व उतारवयात त्याच मुलांकडून अपमानास्पद जीवन जगावे लागे नये यासाठी २००७ मध्ये आई-वडील व वरीष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम काढण्यात आला़ मात्र, अजुनही या नियमाबाबत जनजागृती झालेली नसून वृद्धांना याबाबत माहितीच नाही़ त्यामुळे वृद्धांना आपल्या अधिकारांची व नियमांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘यू आर नॉट अलोन’या मोहिमेतंर्गत पाथर्डी शिवारातील वृद्धाश्रमात रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी सांगितले की, वृद्ध हे एकटे नसून त्याच्या मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर आहे़वृद्धांसाठी असलेल्या अधिनियमातील तरतुदीनुसार वरीष्ठ नागरिक हे स्वत:च्या कमाईने किंवा असलेल्या संपत्तीचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहेत ती आपल्या मुलाच्या विरूद्ध किंवा आपल्या नातेवाईकाच्या विरूद्ध पोटगीचा दावा करू शकतात़ या अर्जावर मुलांना किंवा नातेवाईकांना नोटीसीची बजावणी झाल्यापासून ९० दिवसांच्या आत या अर्जावर हुकूम होणे आवश्यक आहे़ पालन पोषणासाठी देण्यात येणारी रक्कम राज्यशासनाने ठरवून दिलेली असेल व त्याप्रमाणे देण्याचे आदेश न्यायाधिकरण देऊ शकते मात्र ही रक्कम प्रतिमहिना दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही़ तसेच या कायद्यानुसार सरकारी दवाखाने अंशत: किंवा पूर्ण अनुदान प्राप्त दवाखान्यात वरीष्इठ नागरिकांकरीता पलंग व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे बुक्के यांनी सांगितली़
यावेळी वृद्धांनी न्यायाधीश बुक्के यांच्याकडे आपले विविध प्रश्न मांडले़ त्यानंतर बुक्के यांना वृद्ध महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले़ मानवसेवा केअर सेंटरच्या संचालक ललीता नवसागर व टी़नवसागर यांनी मान्यवरांचे आभार मानले़