नाशिककरांना जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:24 PM2018-05-15T15:24:18+5:302018-05-15T15:24:18+5:30
दिलासा : गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणातही पुरेसा पाणीसाठा असल्याने नाशिककरांना पाण्याची चिंता भेडसावणार नाही. गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर महापालिकेकडून सद्यस्थितीत धरणातून प्रतिदिन ३९५ दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. यंदा, भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे वेळेत आगमन होऊन सरासरी पावसाचा अंदाज वर्तविल्याने जुलैमध्येच धरणांत पाणी येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातील ३९०० द.ल.घ.फू. तर दारणा धरणातील ४०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षित आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात २०३१ दलघफू म्हणजे ३६ टक्के पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ३०६७ दलघफू म्हणजे ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ३९५ दसलक्षलिटर्स तर दारणातून प्रतिदिन ४५ दसलक्षलिटर्स याप्रमाणे एकूण ४४० दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा दोन्ही धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे, नाशिककरांना अडीच ते तीन महिने पाण्याची चिंता भेडसावणार नसल्याचा दावा मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केला जात आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणात सद्यस्थितीत १६४५ द.ल.घ.फू. म्हणजे ८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काश्यपी धरणातील पाणी हळूहळू गंगापूर धरणात आणले जात आहे. त्यामुळे, पाण्याचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे. गौतमी गोदावरी व आळंदीतील पाणीसाठा आता आटला आहे. गंगापूर धरणातील आरक्षित पाण्याची पूर्ण उचल महापालिकेकडून होणार आहे. दरम्यान, यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर सक्रीय होण्याचा आणि सरासरी इतके पाऊसमान वर्तविल्याने जुलैमध्येच धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.