मतदारांसाठीही ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:36 PM2019-09-04T15:36:58+5:302019-09-04T15:38:18+5:30
मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा ...
मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने जिल्हाभर या यंत्रणाची माहिती देण्याची मोहिम पुन्हा एकदा सुरू केली आहे. गावावागात जाऊन मतदारांना ईव्हीएमची माहिती दिली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यंत्रांच्या पडताळणी कामाला वेग आलेला आहे. जवळपास २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे.आता मतदानयंत्राची माहिती मतदरांपर्यंत पोहचविली जात असून यासाठी विशेष वाहन देखील तयार करण्यात आले आहे.
गावागावात जाऊन मतदारांना यंत्रांची ओळख करून दिली जात असून प्रत्यक्ष केलेले मतदान आणि मशीनवर उमटणारे मतदान याचे प्रात्याक्षिक दाखविले जात आहे शिवाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांचे देखील प्रात्याक्षिक करून दाखविले जात आहे. मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम या मोहिमेतून केले जात आहे.
निवडणुकीसाठी ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे अंबड येथील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सदर मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. े. मतदानासाठी राज्यात मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम ही यंत्रे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुणे व बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. नाशिकला बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे मिळाली आहेत.