नाशिकमध्ये बनावट मृत्यूपत्राद्वारे जमिन हडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 10:47 PM2018-02-06T22:47:52+5:302018-02-06T22:51:41+5:30
नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सगायी मायकल दास (६८, रा. धोंडीरोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सगायी मायकल दास (६८, रा. धोंडीरोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात झरीन मायकल डेव्हिस (वय ६८, रा. ए-५, न्यू गार्डन, अल्मेडा रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह दि. १९ जुलै १९७२ रोजी विंग कमांडर सुधीर कृष्णराव जगताप यांच्याशी झाला होता. त्यानंतर दि. २१ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, दि. २९ सप्टेंबर १९८९ रोजी झरीन यांनी मायकल डेव्हिस यांच्याशी खासगी स्वरूपात लग्न केले. त्यानंतर झरीन व मायकल डेव्हिस हे देवळाली कॅम्प येथील ग्रँड हॉटेल व मुंबईतील बांद्र्याजवळील अल्मेडा रोड येथे राहात होते. याचदरम्यान दि. २ मे २०१५ रोजी झरीन व मायकल पती-पत्नी मुंबई येथे असताना ख्रिस्तेफर डिसूझा, पॅट्रिशानाथ व व्हॅलेरी अॅन मुल्ला यांच्यासमक्ष मायकल यांनी आपली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता झरीन यांच्या नावावर केली होती़
झरीन यांनी भगूर येथील तलाठी कार्यालयात त्यांच्या मालमत्तेच्या दस्तऐवजाची फेरफार होऊन सात-बारा उता-यावर नोंद होण्यासाठी अर्ज केला असता २५ सप्टेंबर २०१७ रोजी देवळाली मंडल अधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटीस मिळाली़ त्यामध्ये संशयित सगायी मायकल दास (रा. धोंडी रोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेने फेरफार नोंदीस आक्षेप घेतल्याचे म्हटले होते़ यानंतर संशयित सगायी व झरीन या आपल्या कुटुंबीयांसह मंडल अधिकारी कार्यालयात आल्या असता संशयित सगायी हिने झरीन यांचे पती मायकल डेव्हिस यांचे दि. ३० मार्च २००५ रोजीचे बनावट इच्छापत्र तयार केल्याचे आढळून आले, तर बनावट इच्छापत्रामध्ये मायकल डेव्हिस यांचे नाव डॉ. एस. पी. वझे असे दिले आहे.
संशयित सगायी मायकल दास यांनी इच्छापत्रासोबत प्रतिज्ञापत्र आणि मायकल डेव्हिस यांचा मृत्यूचा दाखला बनावट पद्धतीने तयार करून संशयित सयागी दास हिने झरीन डेव्हिस यांच्या मालकीची २४ गुंठे जमीन हडपण्याचा कट रचून दि. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी वर्तमानपत्रात वरील मिळकतीबाबत टायटल व्हेरीफिकेशनसाठी जाहीर नोटीस दिली. त्यामुळे झरीन यांना मिळालेल्या नोटिसीनुसार त्यांनी आपल्या मालमत्तेची माहिती मिळविली असता संशयित सगायी हिने झरीन यांच्या पतीचे बनावट इच्छापत्र, तिचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र आणि मायकल डेव्हिस यांचा बनावट मृत्यूचा दाखला तयार केल्याचे आढळून आले.