मातोरी-मखमलाबाद येथील स्थानिक शेतकऱ्यासमोर चारा-पाण्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:07 PM2019-05-12T19:07:36+5:302019-05-12T19:08:42+5:30
मातोरी : दुष्काळाच्या झळा नाशिक जिल्ह्याला होरपळून काढत आहे. पाण्यावाचून माणसांचीच नाही तर मुक्या जिवांची लाहीलाही होत आहे. यंदा ...
मातोरी : दुष्काळाच्या झळा नाशिक जिल्ह्याला होरपळून काढत आहे. पाण्यावाचून माणसांचीच नाही तर मुक्या जिवांची लाहीलाही होत आहे. यंदा भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असताना सर्व जीव पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे दिसत आहे. मातोरी, म्हसरूळ, मखमलाबाद येथील स्थानिक शेतकऱ्यांसमोर चारा- पाण्याची समस्या उभी असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काठीवाडी समाजाच्या पुढे या दुष्काळाचे आव्हान आवासून उभे आहे. जनावरे जगवायची कशी हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे, त्यानुसार शासनाने गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी योग्य ती सोयदेखील केली आहे. ही सोय झाली दुष्काळी भागातील, परंतु दुष्काळ जाहीर नसलेला पण दुष्काळाची झळ सहन करणाऱ्यांचे काय, असा प्रश्न आहे. नाशिक शहरातील दरी, मखमलाबाद, मसरूळ गावांमध्ये काठीवाडी समाजाच्या तीन पिढ्या गायी पाळण्याचा व्यवसाय करत आहेत. तिन्ही ठिकाणच्या गो-पालकांना स्वत:ची जागा नाही, दरी येथील गावकीच्या जागेत तर म्हसरूळ, मखमलाबाद येथील काठीवाडी समाज भाडोत्री जागेत गायींचा सांभाळ करत आहेत. गायी चारण्यासाठी डोंगरावर, शेतकºयाच्या शेतात, तर ओहळात घेऊन जात असत. डोंगरावरील चारा संपल्याने शेतातून चारा आणणे हाच पर्याय होता. मागील महिन्यापर्यंत शेतकºयांनी पाण्याची सोय शेतात केली होती. तर कालव्याला पाणी आल्याने जनावरांचा पाणीपुरवठा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला होता. पण आता विहिरीमध्येही पाणी राहिले नसल्याने जनावरांना पाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत आहे. दिवसभर जिथून पाणी मिळेल तेथून म्हणजेच चार ते पाच किलोमीटरवरून बैलगाडीच्या माध्यमातून पाणी आणावे लागत आहे, तर रानातील चारा शिल्लक न राहिल्याने जनावरे जगवायची कशी, त्यांना चारा आणायचा कोठून हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. प्रत्येकाकडे साधारण १००च्या आसपास जनावरे आहेत, मात्र त्यांना निवारा नाही, त्यामुळे कोठेही एखाद्या झाडाखाली ही जनावरे घेऊन जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. शासनाकडून त्यांना कोठेही कोणतीही चारा छावणी किंवा पाणीपुरवठ्याची सोय केल्याचे दिसत नाही. चारा-पाण्याची सोय करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
-------------