पंधरवड्यात सरासरी फक्त ७० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:08 PM2019-07-18T16:08:26+5:302019-07-18T16:09:59+5:30
नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच पावसाने दडी ...
नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात केवळ सहा, तर जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत ७० मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अजूनही २७४ पाण्याचे टॅँकर्स सुरू असून, केवळ ३६ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.
यंदाच्या अल्पशा पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकाची चिंता लागली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये समाधानकारक पाऊस बरसला असला तरी अन्यत्र तालुक्यांमध्ये मात्र ठणठणात असल्याने शेतकºयांपुढे पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दोनदा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र हवामान खात्याचा हा अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे १९ तारखेनंतर राज्यात पाऊस परतण्याची शक्यता हवामान खाते वर्तवित असले तर त्यावर कितपत विश्वास ठेवावा, अशी भावना शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली तर इगतपुरीत झालेल्या ६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही पावसाचा थेंबही पडलेला नाही. याउलट कडाक्याचे ऊन आणि घामाच्या धारा सुरू झाल्यामुळे पावसाळ्यातही नागरिकांना उन्हाळ्याची अनुभूती येत आहे. जिल्ह्यातील जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ५६७१ मि.मी. इतके असताना यंदा जुलैच्या मध्यावर केवळ ७० मि.मी. पाऊस झाल्याने उर्वरित पंधरा दिवसांत होणाºया पावसावर शेतकºयांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.