कामावरून काढल्याच्या कारणावरून गुदाम पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:46 PM2017-09-04T23:46:09+5:302017-09-04T23:49:47+5:30
नाशिक : पुस्तक विक्रीच्या दुकानात कामास असलेल्या युवकाने कामावरून कमी केल्याच्या रागातून पुस्तकाच्या गुदामात पेटलेला कागद फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२) मध्यरात्रीच्या सुमारास रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित सागर सुरेश हिवाळे (२२, रा़ लोणार लेन, रविवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूर रोडवरील मंगलनगरमधील रहिवासी धीरज अजय कारिया यांचे रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये पुस्तकांचे दुकान आहे़ या दुकानात कामास असलेल्या सागर हिवाळे यास कारिया यांनी कामावरून कमी केले होते़ याचा राग मनात धरून संशयित हिवाळे याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राठी मार्केटमधील पुस्तकांच्या गुदामाच्या उघड्या खिडकीतून पेटता कागद टाकला़ यामुळे दुकानात रॅकमध्ये ठेवलेली पुस्तके जळून खाक झाली असून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी हिवाळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे़