नाशिकच्या आयडीबीआय बँकेतून ८७ हजारांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:31 PM2018-04-09T21:31:48+5:302018-04-09T21:31:48+5:30
नाशिक : द्वारका परिसरातील आयडीबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या दुकानातील कर्मचाऱ्यास त्याच्या मालकाची ओळख सांगून त्याच्याकडील ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना सोमवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ बँकेतून रोकड लांबविणारा हा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
नाशिक : द्वारका परिसरातील आयडीबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या दुकानातील कर्मचाऱ्यास त्याच्या मालकाची ओळख सांगून त्याच्याकडील ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना सोमवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ बँकेतून रोकड लांबविणारा हा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ सारस्वत बँकेतून २८ लाखांची रोकड लांबविण्यात आल्याच्या घटनेनंतर पुन्हा अशाच प्रकारची घटना आयडीबीआय बँकेत घडल्याने पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओडिसा येथील सुभ्रत जैन यांचे द्वारका परिसरात महाविनायक पेंट्स नावाचे दुकान आहे. या दुकानात आतिश देवीदास सोनवणे (२५, रा. टागोरनगर) हा युवक कामास असून, सोमवारी बँकेत दुकानातील पैसे भरण्यासाठी गेला होता़ बँकेतील रोखपालाकडे पैसे देण्यापूर्वी पांढरा शर्ट घातलेला संशयित आतिशला भेटला व मालकासोबत ओळख असल्याचे सांगत मालकाचे पैसे द्यावयाचे बाकी असल्याचे सांगितले़ यानंतर मदतीचा बहाणा करून आतिशकडील ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लांबवून रिक्षामध्ये बसून फरार झाला़
सदर प्रकार आतिश सोनवणेच्या लक्षात येताच त्याने भद्रकाली पोलिसांना माहिती दिली असता ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता ४० ते ५० वयोगटातील संशयिताने सोनवणे यांच्याशी संवाद साधत नोटा मोजण्याच्या बहाण्याने रोकड लांबवून रिक्षातून पलायन केल्याचे दिसून आले़ पोलिसांनी या रिक्षाचा शोध लावून चालकास ताब्यात घेतले, मात्र संशयित रिक्षात बसण्यापूर्वीच दोन प्रवासी रिक्षात होते़ तसेच काठे गल्लीतील सीसीटीव्हीत भामटा सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे उतरून गेला़
दरम्यान, सारस्वत बँकेतून २८ लाखांची रोकड लुटल्याची घटना घडल्यानंतरही पुन्हा अशाच प्रकारच्या घटना घडत आहेत़ यामुळे बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी जात असलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़