इंदिरानगरमधील फर्निचर दुकानास आग : लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:31 PM2017-10-06T23:31:16+5:302017-10-06T23:33:17+5:30
नाशिक : वडाळा - पाथर्डी रस्त्यावरील सिमेन्स कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या रंग, फर्निचर व प्लॅस्टिकच्या दुकानास शुक्रवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास आग लागली़ वेल्ंिडगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याने आग भडकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़
सिमेन्स कॉलनीमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये घरासाठी दिले जाणारे रंगाचे यमुना ट्रेडर्स, प्लायवूडचे भारत ट्रेडर्स व फर्निचरचे यमुना फर्निचर असे तीन दुकाने आहेत़ प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार सायंकाळी या ठिकाणी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली़ रंगाचे दुकान असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले़ त्यालगतच असलेले प्लायवूड व फर्निचरच्या दुकानांनी पेट घेतला़ या दुकानांशेजारीच असलेल्या उमा रो-हाउसमधील आठ कुटुंबीयांना नगरसेवक श्याम बडोदे व त्यांच्या सहकाºयांनी बाहेर काढले व त्वरित अग्निशमन दलास फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली़
सिडकोतील अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी प्रथम दाखल झाला मात्र दुसरा बंब येण्यासाठी तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली व या कालावधीत आगीने रौद्ररूप धारण केले व यामध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता़ सुमारे आठ बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली़ दरम्यान बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझविण्यास व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़