नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:38 AM2019-11-19T01:38:04+5:302019-11-19T01:39:52+5:30
राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. यामुळे नागरिकांना सकाळी बोचरी थंडी जाणवली तर सायंकाळी गुलाबी थंडीचा अनुभव आला.
नाशिक : राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. यामुळे नागरिकांना सकाळी बोचरी थंडी जाणवली तर सायंकाळी गुलाबी थंडीचा अनुभव आला.
चालू वर्षी जूनपासून नव्हे तर जुलैपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. मान्सूनचे उशिराने झालेले आगमन चांगलेच लांबले अन् परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हजेरी कायम ठेवली. यंदा नाशिककरांना पावसामुळे ‘आॅक्टोबर हीट’ फारशी जाणवली नाही. थंडीचे आगमन काहीसे उशिराने झाले. शहराचे किमान तापमान रविवारपर्यंत १७ अंशांच्या जवळपास राहत होते, मात्र सोमवारपासून अचानकपणे पारा घसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
मागील वर्षी १७ डिसेंबरला शहराचा पारा ८.५, १९ डिसेंबर रोजी ७.९ अन् २७ डिसेंबरला थेट ५.७ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडे आहे. यंदा ५ अंशांचा विक्रम मोडीत निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.