नाशिककरांनो, कृपया घरीच सुरक्षित राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:47 PM2020-04-07T23:47:26+5:302020-04-07T23:47:59+5:30
योगेश सगर । कसबे-सुकेणे : कोरोनाची परिस्थिती हाताळताना अमेरिकेत निष्काळजीपणा जिवावर बेतला आहे, परंतु अमेरिकेच्या तुलनेत भारताची लोकसंख्या मोठी ...
योगेश सगर ।
कसबे-सुकेणे : कोरोनाची परिस्थिती हाताळताना अमेरिकेत निष्काळजीपणा जिवावर बेतला आहे, परंतु अमेरिकेच्या तुलनेत भारताची लोकसंख्या मोठी आहे. मोठा धोका पत्करून चालणार नाही. म्हणून नाशिककरांनो ...प्लीज ...प्लीज घरीच थांबा... सुरक्षित राहा... अशी साद मूळचे नाशिककर पण सध्या अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या युवा अभियंत्यांनी नाशिककरांना घातली आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतांश उच्चशिक्षित तरुण अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. यातील नाशिकचे दोन मेकॅनिकल इंजिनिअर परीक्षित कैलास घोगरे आणि प्रणव सुनील औंधकर या दोन युवकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अमेरिकेतील सद्यपरिस्थिती आणि उपाययोजना तसेच भारताने करावयाच्या उपाययोजना याविषयावर ‘लोकमत’शी संवाद साधला. नाशिक येथील डॉ. सुनील औंधकर यांचा मुलगा प्रणव हा अमेरिकेतील मिशिगन राज्यात डेट्रॉइट या जवळपास साडेसात लाख लोकवस्ती असलेल्या शहरात आॅटोमोबाइल हबमधील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतो. कोरोनाबाबत प्रणव सांगतो, अमेरिका इतकी भयावह परिस्थिती प्रथमच अनुभवत आहे. आजमितीस मिशिगन स्टेटमधील फक्त अत्यावश्यक सेवा आणि त्यासंबंधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरू आहेत. जर तुम्ही क्वॉरण्टाइन सोडून घराबाहेर आलात तर येथील प्रशासन अमेरिकन एक हजार डॉलर दंड किंवा नव्वद दिवसांच्या तुरु ंगवासाची शिक्षा देते. मी गेल्या दोन आठवड्यांपासून घरात आहे. सध्या आम्हाला सॅनिटायझर, मास्क, टिश्यू पेपर, नॅपकिन यांचा मोठा तुटवडा भासत आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. कम्युनिटी स्प्रेड होण्याची मोठी चिंता वाटते. त्यामुळे नाशिककरांनो प्लीज घरी थांबा, सरकारच्या सूचनांचे पालन करा, असेही प्रणव याने सांगितले. तर लासलगावजवळील पिंपळद-टाकळी येथील कैलास घोगरे यांचा मुलगा परीक्षित घोगरे हा नॉर्थ अमेरिकेतील शिकागोजवळील शेरॉन टाउन येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. परीक्षित म्हणतो, चीननंतर भारताला कोरोनाचा मोठा धोका असल्याने आम्हाला मायभूमीची चिंता सतावत होती, परंतु भारत सरकारने अचूक वेळ साधत केलेले लॉकडाउनसारखे प्रयत्न आणि भारतीयांनी पाळलेले सोशल डिस्टन्सिंग यामुळे भारतात कोरोनो आज तरी आम्हाला नियंत्रणात दिसत आहे. मी राहत असलेल्या नॉर्थ स्टेटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी अमेरिकेच्या पूर्व भागातील सागरी किनाºयावरील मोठ्या शहरात त्याचा प्रादुर्भाव मोठा आहे. नाशिककरांनो, तुम्हीही घरीच थांबा, काळजी घ्या असे आवाहनही परीक्षितने केले आहे.
इटलीनंतर अमेरिकेत कोरोना संसर्ग मोठा आहे. याला जबाबदार कोण असल्याचे विचारले असता, यावर या युवकांनी सांगितले की, अमेरिकेने सुरुवातीला लॉकडाउन उशिरा केले व ते राज्यानिहाय केले. काही प्रमाणात निष्काळजीपणाही केला. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली, परंतु सध्या न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात परिस्थिती गंभीर असली तरी इतर राज्यात नियंत्रणात आहे. अमेरिकेत लॉकडाउन करताना भारताप्रमाणे अत्यावश्यक आणि अनावश्यक असे दोन भाग केले गेले आहे, त्यामुळे अमेरिकेत सध्या अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यासंबंधी उत्पादन घेणाºया कंपन्याही सुरू आहेत. भारताचे प्रयत्न अमेरिकेच्या तुलनेत योग्यच असल्याचे हे युवा अभियंते आवर्जून सांगतात.