‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

By अझहर शेख | Published: February 22, 2020 08:46 PM2020-02-22T20:46:03+5:302020-02-22T20:47:53+5:30

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला संवाद...

Nashikites retain the fame of 'Ramsar' | ‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

googlenewsNext
ठळक मुद्देजगभरात २ हजार ३०१ पाणथळ जागांना रामसरकडून संरक्षणभारतातील विविध राज्यांमधील तब्बल ३१ पाणथळ जागांचा समावेश

- ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. सालीम अली यांनी ‘हे तर महाराष्ट्रचे भरतपूर’ असे गौरवोद्गार नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या भेटीत काढले होते. येथील पाणथळ जागेवरील समृध्द जैवविविधता या पाणथळाचे वैभव वाढविते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रामसरच्या पाणथळांच्या यादीत नांदूरमधमेश्वर अभयारण्याला स्थान मिळू शकले.
समृध्द जैवविविधतेचे जतन-संवर्धन ही काळाची गरज ओळखून नाशिक वन्यजीव विभागाने ठोस पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने सर्वप्रथम अभयारण्य क्षेत्राच्या सीमांकनाचा प्रश्न लवकरच सोडविण्यास प्रशासनाला यश येणार आहे. अभयारण्य क्षेत्रात सात ते आठ प्रजातींचे सस्तन वन्यजीव, २४ प्रकारचे मासे, पक्ष्यांच्या २६५ प्रजाती आढळून येतात. अभयारण्याचा अधिवास लक्षात घेता येथील जैवविविधता अधिकाधिक समृध्द व परिपूर्ण होत गेली. पाणथळ जागेवर उगविणारे गवत, भुपृष्ठीय वनस्पतींच्या ५३६ प्रजातींसह फुलपाखरांच्या ४१ प्रजाती येथे आढळतात. दरवर्षी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा हिवाळ्याचा हंगाम उशिराने सुरू झाल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमनही लांबले; मात्र त्यासोबतच मुक्कामही वाढला आहे. रामसर दर्जा मिळाल्यामुळे भविष्यात पर्यटकांसाठी येथे सोयीसुविधा अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या पुरविणे शक्य होणार आहे. तसेच पर्यटनवृध्दी होऊन स्थानिकांच्या रोजगारालाही चालना मिळण्यास मदत होईल.

  • ‘रामसर’ प्रस्ताव पाठविण्यामागील उद्देश काय होता ?

- नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे ‘रामसर’च्या यादीत समाविष्ट होण्याची ताकद ठेवणारे राज्यातील एकमेव पाणथळ आहे, याची खात्री वन्यजीव प्रशासनाला होती. विविध जाती-प्रजातीचे देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचे २६५ प्रकार येथे आढळून येतात. ‘रामसर’मध्ये आढळणाºया १४८ स्थलांतरीत पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आढळून येतात. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरची ही जमेची बाजू आहे. ‘रामसर’च्या यादीत नांदूरमध्यमेश्वरला स्थान मिळाल्याने या वैभवशाली पाणस्थळ ठिकाणाला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावरून या पाणथळ ठिकाणाच्या संवर्धनासाठी निधीची उपलब्धता होईल आणि इको-टुरिझमला चालना मिळून रोजगारनिर्मितीच्या वाटा प्रशस्त होतील तसेच जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणाला हातभार लागण्यास मोठी मदत होईल, हा यामागील मुख्य उद्देश होता.

  • रामसर साईट’ म्हणजे नेमके काय ?
  • -इराणमधील रामसर या शहरात १९७१सााली जागतिक स्तरावर पाणथळ जागा संवर्धनहेतूने आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत १७०हून अधिक देश सहभागी झाले होते. त्यात भारताचाही समावेश होता. पाणथळ जागांचे संवर्धन मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी व जलपरिसंस्थांची अन्नसाखळी टिकवून त्याचे संवर्धनाविषयी या परिषदेत मंथन घडून आले. रामसर’च्या दर्जाच्या जगभरात एकूण २ हजार ३०१ पाणथळ जागा शोधल्या गेल्या. त्यामध्ये आॅस्ट्रेलियामधील पाणथळ जागा १९७४साली सर्वप्रथम ‘रामसर’ म्हणून घोषित करण्यात आली. परिषद रामसरमध्ये पार पडल्याने संस्थेचे नाव ‘रामसर’ असे निश्चित करण्यात आले. याचे मुख्य कार्यालय स्वित्झरलॅँड येथे आहे. भारतात एकूण ३१ पाणथळ जागांचा ‘रामसर’च्या यादीत समावेश असून महाराष्टÑातील एकही जागा त्यामध्ये अद्याप नव्हती; मात्र नांदूरमधमेश्वर अभयारण्याच्या रूपाने आता महाराष्टÑाने ‘रामसर’मध्ये प्रवेश केला आहे.

 

  • रामसर कराराचे हे आहेत मुळ आधारस्तंभ कोणते ?

- धोरणात्मक वापर : दलदली परिसंस्थांना हाणी पोहचणार नाही, याबाबत संपुर्ण खबरदारी घेत तेथील संसाधनाचा शाश्वत वापर करण्यास हा करार मान्यता देतो.
रामसर यादी : संवेदनशील व पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या दलदली प्रदेशांचा शोध घेऊन त्यांना ‘रामसर क्षेत्र’ संबोधित करून यादीत स्थान देण्याबरोबरच तेथील प्रभावी आण िशाश्वत व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील राहणे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य : या परिसंस्थांच्या धोरणात्मक वापर व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य करणे.
संस्थेच्या यादीत भारतातील विविध राज्यांमधील तब्बल ३१ पाणथळ जागांचा समावेश आहे. यामध्ये नुकतेच महाराष्ट्रतील नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर या पाणथळ जागेला स्थान मिळाले .महाराष्ट्रतील हे एकमेव पिहलेवाहिले पाणथळ ठरले.
नैसिर्गक अन्नसाखळी व जल परीसंस्था टिकवून ठेवणे काळाची गरज बनली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे विविध आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पाणथळ जागांचे संवर्धन महत्त्वाचे ठरते. पाणथळ जागा नष्ट झाल्या तर निसर्गाची आणि पर्यायाने पृथ्वीची अपरिमित हानी होईल, असे अभ्यासकांचे मत आहे. जगभरात २ हजार ३०१ पाणथळ जागांना रामसरकडून संरक्षण प्राप्त करून देण्यात आले आहे. सर्वप्रथम आॅस्ट्रेलियामधील पाणथळ जागा ही जगाची पिहली रामसर जागा म्हणून घोषित केली गेली.
 

  • नांदूरमधमेश्वरच्या सिमांकनाविषयी सांगा?

-नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरुन संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणा-या अडचणींवर मात करणे शक्य होईल. यासाठी बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासकांनी अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२नुसार चौकशी पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ व सर्वोच्च न्यायालयाकडे क्षेत्र बदलाच्या अंतिम सिमांकन निश्चितीच्या परवानगीसाठी पाठविला जाईल. सिमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसीत करुन खात्रीशिरपणे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजन करण्याचा मार्ग मोकळा होईल. दुसरा फायदा इको टुरिझमला चालना मिळेल व स्थानिक गावकऱ्यांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. सिमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांना व अभयारण्यालादेखील आहे. त्यामुळे सिमांकन होणे गरजेचे आहे, आणि नाशिक वन्यजीव विभाग त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे.

 

  • सांडपाण्याबाबत काय पावले उचलली जाणार आहेत?

- नाशिकची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गोदावरीच्या माध्यमातून नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळते. तसेच कादवा नदीमार्फत निफाड तालुक्यातील सांडपाणी अभयारण्यात येऊन मिसळते आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील सांडपाणीही गोदावरीतून अभयारण्यात येते. या सांडपाण्यावर मल-जलशुध्दीकरण केंद्रात महापालिकेद्वारे केली जात असल्याचा दावा केला जातो; मात्र यानंतरही पाण्यात प्रदूषण करणारे घटक विषारी द्रव्य आढळून येते. याबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मदत घेऊन वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासणी केली जाणार आहे. अभयारण्यात सांडपाण्यामार्फत विषारी घटकाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करुन संबंधित विभागालाही त्याबाबत सूचना करण्यात येईल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशीही याबाबत पत्रव्यवहार केला जाणार आहे. तरीदेखील नांदूरमधमेश्वरला मिळालेला रामसरचा नावलौकिक टिकवून ठेवणे नाशिककर जनतेच्या हाती आहे.

- शब्दांकन : अझहर शेख

Web Title: Nashikites retain the fame of 'Ramsar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.