नाशिक जिल्ह्यातील वाढते कुपोेषण वेदनादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:19 PM2018-03-23T19:19:11+5:302018-03-23T19:19:11+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शीतल सांगळे : अंगणवाडी सेविका, मदतनीस गौरव सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन
नाशिक : औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिपथावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण असणे ही वेदनादायक बाब असून, कुपोषणमुक्तीसाठी सर्व घटकांचे प्रयत्न लागणार आहेत. ज्या भागात कुपोषणाचे प्रमाण आहे तेथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने त्यांनी ममत्वाने कुपोषणग्रस्त बालकांची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी सांगळे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच खऱ्या अर्थाने आदिवासी, खेड्यापाड्यात मोठ्या कष्टाचे काम करीत आहेत. नाशिक जिल्ह्याला कुपोषणाचा शाप लागल्याने यातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिकाच महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी म्हणून सूचना केल्या जातात; परंतु प्रत्यक्ष कुपोषणग्रस्तांबरोबर राहून त्यांच्या यातना जाणणाºया अंगणवाडी सेविका खºया अर्थाने आमच्यापेक्षाही मोठ्या ठरतात. शासन, पदाधिकारी या प्रश्नाच्या बाबतीत गंभीर आहेच; परंतु अंगणवाडी सेविकांच्या मदतीशिवाय हे काम पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगळे यावेळी म्हणाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अंगणवाडी सेविका करत असलेल्या कामाचे कौतुक करून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, कविता धाकराव, नूतन अहेर, निफाड पंचायत समितीचे सभापती पंडित अहेर यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. डॉ. सुप्रिया खोटे यांचे यावेळी कुपोषण आणि किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर व्याख्यान झाले.