कन्हैयाकुमार उद्या नाशिकमध्ये; चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 08:26 PM2018-08-19T20:26:38+5:302018-08-19T22:55:00+5:30
नाशिक : तरुणांनी आपल्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार सोमवारी (दि.२०) नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्चा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे ५६वे व्याख्यान सोमवारी गुंफले जाणार आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्याला झालेली अटक आणि राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारसरणीमुळे कन्हैयाकुमारचे भाषण नेहमीच वादग्रस्त ठरल्याने त्याच्या भाषणांवर अनेकदा बंदीदेखील आलेली होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमध्ये आलेल्या कन्हैयाकुमारच्या भाषणाला तीव्र विरोध करण्यात आला होता. यंदा मात्र पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, तरुणांच्या प्रश्नांना वाचा फुटावी यासाठी कन्हैयाकुमार आपली भूमिका मांडणार असल्याचे व्याख्यानमाला आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमात कोणताही गदारोळ होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणचा रात्रीच ताबा घेतला जाणार आहे.