नाशिककर गारठले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:32+5:302021-02-09T04:16:32+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून, ...
शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून, पारा चढ-उतार होत आहे. फेब्रुवारी उजाडल्यापासून किमान तापमान ११ ते १३ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र या दोन दिवसांत किमान तापमानासह कमाल तापमानातसुद्धा वेगाने घसरण झाल्याने नाशिककर चांगलेच गारठले. शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे. रविवारी पहाटेही थंडीचा कडाका होता; मात्र सोमवारी यामध्ये अधिकच वाढ झाल्याचे जाणवले. सूर्योदयानंतरही वातावरणात गारठा कायम राहिला. दिवसभर शहरात वाऱ्याचा वेग अधिक राहिल्याने गारवा जाणवत होता. त्यामुळे नाशिककरांनी या हंगामात प्रथमच दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. घरे, कार्यालयांमध्ये पंखे पूर्णपणे बंदच होते.
शनिवारी रात्री ९ वाजेपासूनच शहर व परिसरात थंड वारे वेगाने वाहत आहेत. यामुळे नाशिककरांना शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरण्यास सुरुवात झाली आहे.
-- इन्फो--
मागील वर्षाच्या तुलनेत थंडी कमीच
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा प्रकोप तसा बघितला तर कमीच असल्याचे दिसून येते. हंगामात नववर्षाच्या प्रारंभी २३ डिसेंबर रोजी ८.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली होती.
---इन्फो--
दोन दिवसांपासून नाशिक राज्यात अव्वल
नाशिकमध्ये मागील दोन दिवसांपासून अचानकपणे थंडीचा कडाका वाढला असून, नाशिक राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान असलेले शहर म्हणून नोंदविले जात आहे. रविवारी नाशिकमध्ये १०, तर सोमवारी थेट ९.२ अंशांवर पारा घसरला. यामुळे सोमवारीही नाशिक थंडीच्या बाबतीत राज्यात आघाडीवर राहिले.
---
पॉइंटर्स (ही शहरे गारठली)
नाशिक @ ९.२
निफाड @६.०
नागपूर @९.४
मालेगाव @९.६
पुणे @९.६
जळगाव @१०.२
ब्रह्मपुरी @१०.३
गोंदिया @१०.५
===Photopath===
080221\08nsk_29_08022021_13.jpg
===Caption===
नाशकातील गोदाकाठ गारठला