नाशिककर गारठले : ८.४ अंश नीचांकी किमान तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 02:53 PM2020-12-22T14:53:19+5:302020-12-22T14:58:21+5:30
राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहु लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे.
नाशिक : शहर व परिसरात रविवारी संध्याकाळपासून अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत होता. मंगळवारी (दि. २२) पहाटेपासून थंडीचा कडाका चांगलाच जाणवला. सकाळी साडेआठ वाजता ८.४ अंश इतके तापमान नोंदविले गेले. हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान आहे.
हवामान अन् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. दोन दिवसात किमान तापमानाचा पारा थेट चार अंशांनी खाली घसरला.
शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहु लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिक शेकोट्या व ऊबदार कपड्यांचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत.
ऊबदार कपडे खरीदेवर भर
थंडीचा कडाका वाढताच ऊबदार कपड्यांच्या खरेदीची नाशिककरांची लगबग बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. रविवारपासून शरणपूररोडवरील तिबेटियन बाजार, मेनरोड, शालीमार या भागातील दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ऊबदार कपडे खरेदीवर भर दिला जात आहे.