नाशिककर उष्म्याने हैराण; उन्हाचा वाढला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:28+5:302021-04-27T04:15:28+5:30
------ नाशिक : शहरात मागील तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता अतिप्रखरपणे जाणवत आहे. रविवारप्रमाणेच सोमवारीसुद्धा (दि.२६) दिवसभर कडक ऊन होते. ...
------
नाशिक : शहरात मागील तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता अतिप्रखरपणे जाणवत आहे. रविवारप्रमाणेच सोमवारीसुद्धा (दि.२६) दिवसभर कडक ऊन होते. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.५ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. कमाल व किमान तापमानाचा पारा चढता राहत असल्याने रात्रीच्यावेळीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या नाशकात ''हॉट'' वातावरण अनुभवयास मिळत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नाशिककर वातानुकूलित यंत्रांसह कुलर, पंख्याच्या वापरावर भर देत आहे. रविवारी किमान तापमान २१ अंश इतके नोंदविले गेले होते तर सोमवारी यामध्ये वाढ होऊन पारा २२.२ इतके नोंदविले गेले. किमान तापमानदेखील दोन दिवसांपासून वाढत असल्यामुळे रात्रीही उकाड्यापासून नागरिकांची सुटका होताना दिसत नाही. कमाल तपमानात पुढील काही दिवस अशीच वाढ होत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेमोसमी पावसाने हजेरी लावल्यास त्याचा काहीसा परिणाम वातावरणात जाणवेल; मात्र त्यामुळे खूप काही फरक पडणार नाही. एप्रिलचा अखेरचा हा आठवडा अधिकाधिक 'ताप'दायक ठरणारा आहे. एप्रिलअखेर कमाल तापमानाचा पारा चाळीशी ओलांडण्याची श्यक्यता नाकारता येत नाही, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
उन्हाची वाढलेली तीव्रता आणि कोरोनाचा वाढता फैलावामुळे नाशिककरांनी सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे सर्वच परिसर निर्मनुष्य झालेला दिसून आला.