चारधाम यात्रेतील नाशिककर सुखरूप
By Admin | Published: June 29, 2015 02:09 AM2015-06-29T02:09:25+5:302015-06-29T02:09:25+5:30
उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका बसून बद्रीनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र यात्रेतील नाशिककर भाविक सुरक्षित आहेत.
नाशिक : उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका बसून बद्रीनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र यात्रेतील नाशिककर भाविक सुरक्षित असून, ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती विविध टूर कंपन्यांनी दिली. नाशिकमधून सुमारे १० हजार भाविक यात्रेला गेल्याचे समजते.
बद्रीनाथ परिसरात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला असून, यात्रा मार्गावर काही ठिकाणी मोठे दगडगोटे वाहून आले आहेत. प्रशासनाने आपातकालीन स्थितीमुळे यात्रा स्थगित केली आहे. पुढील दोन दिवसांत अडथळे दूर झाल्यावर यात्रा पूर्ववत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे केदारनाथ परिसरात मोठी हानी झाली होती. त्यानंतर भीतीमुळे चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या घटली होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बुधवारपासून यात्रेकरू ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक स्थिती बिकट असल्याने सध्या यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
गंगोत्री यमुनोत्री यात्रा मात्र सुरळीत सुरू आहे. बद्रीनाथ-केदारनाथचे दर्शन दोन दिवसांपासून बंद असून, लवकरच ते सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. नाशिकच्या काही भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन न घेताच परतण्यास प्राधान्य दिले आहे.
केदारनाथ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या तेथील प्रवासी वाहतूक आम्ही बंद केली आहे. काही प्रवाशांनीही बुकिंग रद्द केले आहे.