अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी झाले 'कराकेळी' पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:28 PM2020-04-26T17:28:38+5:302020-04-26T17:29:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा सण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी ...

nashik,karakeli,pujan,was,performed,from,house,to,house | अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी झाले 'कराकेळी' पूजन

अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी झाले 'कराकेळी' पूजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा सण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असून, यानिमित्त रविवारी (दि.२६) घरोघरी पूर्वजांच्या स्मरणार्थ कराकेळीचे पूजन करण्यात आले. लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठ बंद असली तरी सकाळी काही ठिकाणी रस्त्यालगत विक्रेत्यांकडे कराकेळी व आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
अक्षयतृतीया सणाला पूर्वजांना आमरस व पुरणपोळीचा नैवेद्य (घास ) दाखविण्याची प्रथा असल्याने बाजारात काही ठिकाणी आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. यंदा बाजारात आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त होते. हापूस आंब्याचा दर ३०० ते ४०० रुपये किलो, तर बदाम आंब्याचा दर १५० ते १८० रुपये किलो असा होता. अक्षयतृतीयेला कराकेळी म्हणजेच मातीच्या भांड्यांची पूजा करण्याची प्रथा असली तरी यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्याची खरेदी शक्य नसल्यास घरातील पितळी किंवा तांब्याच्या कलशाची पूजा करता येईल, असे ब्रह्मवृंदानी सांगितले. याकडे दुर्लक्ष करीत नागरिक मातीचे भांडे खरेदीसाठी बाहेर पडले.
दरम्यान, अक्षयतृतीया या सणाला नवीन कपडे, सोने खरेदीची प्रथा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे सर्व दुकाने बंद असल्याने केवळ घरच्या घरीच पूर्वजांच्या स्मरणासाठी कलश पूजन करण्यात आले. कराकेळी पूजन म्हणजे मातीच्या कलशावर डांगर (खरबूज) ठेवण्यात येते, त्यात पाणी भरून हळदी-कुंकू लावून पूजन करण्यात येते. अक्षयतृतीया हा सण खान्देशात तसेच बागलाण, कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणाला या प्रांतात दिवाळीप्रमाणे महत्त्व असल्याने लेकी माहेरी येतात. या सणाला आखाजीचा सण, असेही म्हणतात. मुली ‘आखाजीचा सण मोलाचा देखाजी’ अशी गाणी गातात. तसेच झोके खेळतात. कालानुरूप आता अनेक प्रथा लोप पावत चालल्या आहेत.
अक्षयतृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय्य’ मिळते, असे मानले जाते. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षयतृतीया’ असे म्हटले आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, नवीन वाहन खरेदी अशा गोष्टी केल्या जातात. परंतु लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्याने या गोष्टी शक्य झाल्या नाहीत.

Web Title: nashik,karakeli,pujan,was,performed,from,house,to,house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.