नाशिककरांवर साडेचार कोटींचा फास, म्हणे पर्वणी झाली झक्कास !
By admin | Published: October 1, 2015 12:02 AM2015-10-01T00:02:06+5:302015-10-01T00:03:29+5:30
ठेकेदाराच्या बल्ली बॅरिकेडिंगवर पोलीस खात्याचं चांगभलं
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील प्रत्येक रस्त्याच्या गळ्याला फास लावणाऱ्या पोलिसांच्या बल्ली बॅरिकेडिंगमुळे पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरविली, परिणामी भाविक न आल्याने संपूर्ण यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले, दुसऱ्या पर्वणीला मात्र हेच बल्ली बॅरिकेडिंग कमी करून रस्ते मोकळे करावे लागल्याची नामुष्की पोलीस खात्यावर ओढवली असताना साडेचार कोटी रुपयांचा बल्ली बॅरिकेडिंगचा ठेका कोणी व कशासाठी दिला हा प्रश्न कुंभमेळ्याच्या पर्वण्या आटोपल्यावरही कायम आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून प्रत्येक पर्वणीला ८० लाख ते एक कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज बांधून या भाविकांची गर्दी एकाच वेळी शहरात व विशेषत: रामकुंड, साधुग्राम परिसरात शिरून चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलिसांनी यंदाच्या सिंहस्थात पहिल्यांदाच शहरातील रस्ते बल्ली बॅरिकेडिंगने आवळण्याचा निर्णय घेतला. रामकुंडाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या भाविकांच्या मार्गाला येऊन मिळणाऱ्या उपरस्त्यांची त्यासाठी नाकाबंदी करून नाशिककरांनाच नजरकैदेत ठेवण्यासाठी जवळपास ४० किलोमीटर अंतराचे बल्ली बॅरिकेडिंग करण्यात आले व त्यासाठी मुंबईच्या आर. ई. इन्फ्रा या कंपनीला ठेका देण्यात आला. साडेचार कोटी रुपयांच्या या ठेक्यात पोलीस खात्यातील कोणाचा ‘इंटरेस्ट’ होता याची आता जाहीर चर्चा होत असली तरी, ज्या बल्ली बॅरिकेडिंगमुळे शहरवासीयांना तुरुंगवासाचा अनुभव घ्यावा लागला, बारा वर्षांनी येणाऱ्या पर्वणीच्या मुहूर्ताकडेही पाठ फिरवावी लागली त्या बॅरिकेडिंगने काय साध्य केले? हा प्रश्नही अनुत्तरित राहिला.
बारा वर्षांपूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्यांना ५० लाखांच्या पुढेच भाविकांनी हजेरी लावली होती, तेव्हा करण्यात आली नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची अडवणूक यंदाच्या कुंभमेळ्यात करण्यात आल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बल्ली बॅरिकेडिंग केली की, बल्ली बॅरिकेडिंगसाठी भाविकांना अडविण्यात आले याचा उलगडा पोलिस खात्यातील धुरीण करू शकले नाहीत; मात्र नागरिकांनी व भाविकांनीच अशी परिस्थिती निर्माण केली की, पोलिसांना आपणहूनच बल्ली बॅरिकेडिंगचा अडथळा दूर करावा लागला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून बल्ली बॅरिकेडिंगचा जाहीर निविदेद्वारे ठेका देण्यात आलेला असला तरी, असा ठेका देताना एखाद्या विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून त्यातील नियम, अटी व शर्ती घालण्यात आल्या की काय अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली, परिणामी शहरात वर्षानुवर्षे मंडप व्यवसाय करणारेही निविदेच्या शर्यतीत टिकू शकलेले नाहीत, त्यामुळे शहरातच रोजगार व्यवसाय वृद्धीची संधीही गमवावी लागली.
कुंभमेळ्याची पहिली पर्वणी गर्दीच्या पातळीवर फोल ठरल्यानंतर या पर्वणीला अपेक्षित भाविक येणार नव्हतेच असा पवित्रा नंतरच्या काळात पोलीस खात्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेतला; मात्र त्याच वेळी बल्ली बॅरिकेडिंग भाविकांच्या सुरक्षिततेसाठी किती आवश्यक होती हे पटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला तर त्याचबरोबर या बल्ली बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाल्याची कबुलीही देण्यात आली. बल्ली बॅरिकेडिंगमुळे शहर वेठीस धरले गेल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून पालक मंत्र्यासमक्ष करण्यात आल्यावर त्यात बदल करण्याची भूमिका पोलीस यंत्रणेने घेतली म्हणजेच एक तर पहिल्या पर्वणीचे नियोजन चुकले असेल किंवा या पर्वणीला लाखोंच्या संख्येने भाविक येणार नसल्याचे माहीत असूनही जे काही येणार होते, त्यांची अडवणूक करण्यासाठीच बल्ली बॅरिकेडिंग केली होती हे स्पष्ट होते. पहिल्या पर्वणीला भाविकांच्या कमी गर्दीत रस्ते आवळणाऱ्या पोलीस यंत्रणेने दुसऱ्या पर्वणीला दुपटीने भाविक येऊनही रस्ते मोकळे ठेवले व कोणतीही दुर्घटना न घडता पर्वणी पार पडल्याने बल्ली बॅरिकेडिंगची खरोखरच आवश्यकता होती काय असा प्रश्न पडल्यावाचून राहावत नाही. दोन पर्वण्यांची ही तऱ्हा असताना तिसऱ्या पर्वणीला तर मुसळधार पावसाने पोलीस यंत्रणेचेच काम हलके केले म्हटल्यावर बल्ली बॅरिकेडिंगची गरजच काय ?