छोट्या पडद्यावर नाशिककरांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:10 AM2017-09-18T00:10:33+5:302017-09-18T00:10:45+5:30

एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित आहेत.

Nashikkar's control over small screens | छोट्या पडद्यावर नाशिककरांचा दबदबा

छोट्या पडद्यावर नाशिककरांचा दबदबा

Next

नाशिक : एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित आहेत. चित्रमहर्षि दादासाहेब फाळकेंच्या भूमीत गेल्या दशकभरात गुणी अभिनेता-अभिनेत्रींची एक फळीच छोट्या-मोठ्या पडद्यावर आपले अस्तित्व टिकवून असल्याने नाशिककरांची मान उंचावली आहे.
फाळकेंच्या जन्मभूमीतून कुसुमाग्रज-कानेटकर-बाबूराव बागुल-वामनदादा कर्डक यांच्यासारखी सारस्वत-शाहीर मंडळी नाशिकचा कीर्तीध्वज दिमाखात फडकवित राहिली. मात्र, रंगभूमीसह छोट्या-मोठ्या पडद्यावर ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर फारशी उल्लेखनीय कामगिरी दिसून आली नाही.
गेल्या दशकभरात मात्र जादूची कांडी फिरल्यागत छोट्या-मोठ्या पडद्यावर नाशिककरांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. सध्या तर छोटा पडदा नाशिकच्याच कलावंतांनी व्यापला आहे. त्यातही टीआरपी कमविलेल्या मालिकांमध्ये नाशिकचेच कलावंत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवित आहेत. सध्या ‘माझ्या नवºयाची बायको’ ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल मानली जात आहे. त्यात, राधिका-गुरुनाथची भूमिका साकारणारी जोडगोळी अनिता दाते व अभिजित खांडकेकर हे नाशिकचेच आहेत. याच मालिकेत नाशिकच्याच सुयोग गोरे यांनी छोटीशी भूमिका साकारत आपल्यातील अभिनयाचे दर्शन घडविले आहे. अभिजित खांडकेकरने तर अनेक मोठ्या सोहळ्यांच्या अ‍ॅँकरिंगचीही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.
घराघरांत पोहोचलेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत सध्या नाशिकच्याच सायली संजीव या अभिनेत्रीचा बोलबोला आहे. नाट्यपरिषदेचे सचिव असलेले अभिनेते दीपक करंजीवर तसेच विद्या करंजीकर हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या-मोठ्या पडद्यावर आपले स्थान टिकवून आहेत. तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या ‘फुलपाखरू’ या मालिकेत नाशिकचाच चेतन वडनेरे भूमिका साकारत आहे, तर ‘नकोशी’ मालिकेत सिद्धार्थ बोडकेने आपल्यातील उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले आहे. सध्या गोदावरी नदीसंवर्धनासाठी आणि प्रदूषणमुक्तीचा ध्यास घेतलेला नाशिकचा गुणी अभिनेता चिन्मय उद्गीरकर ‘घाटगे आणि सून’ या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत झळकत आहे. ‘आस्स सासर सुरेख बाई’ या मालिकेत अभिनयासह संवाद लेखकाची भूमिका श्रीपाद देशपांडे सांभाळत आहे. धनश्री क्षीरसागर ही आणखी एक गुणी अभिनेत्री ‘लक्ष्य’ या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेली आहे. कांचन पगारे हा सुद्धा कलावंत छोट्या पडद्यावरील जाहिरातींसह अ‍ॅँकरच्याही भूमिका उत्तमप्रकारे वठवत आहे. याशिवाय, दीपाली कुलकर्णी, अर्चना निपाणकर, किरण भालेराव, गणेश सरकटे, शर्मिष्ठा राऊत यांनीही छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविलेली आहे. सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या मृणाल दुसानीसने ‘माझ्याही प्रियाला प्रीत कळेना’ या सर्वाधिक टीआरपी लाभलेल्या मालिकेद्वारे नाशिकचे नाव घराघरांत नेऊन पोहोचविले. गुणी अभिनेत्री नेहा जोशी हिनेही ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अवघाचि संसार’, ‘तू तिथे मी’, ‘सोनियाचा उंबरा’, ‘सुहासिनी’, ‘का रे दुरावा’ या लोकप्रिय मालिकांमधून प्रतिभासंपन्न अभिनयाचे दर्शन घडविले. सध्या मृणाल दुसानीस अमेरिकेत स्थायिक झालेली आहे, तर नेहा आता छोट्या पडद्याऐवजी चित्रपटांसह व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय झालेली आहे.

Web Title: Nashikkar's control over small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.