‘गुलशनाबाद’ मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना भूरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:15 PM2024-02-09T21:15:39+5:302024-02-09T21:16:35+5:30
केतकीने गायलेल्या ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गीताने उपस्थितांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
नाशिक (सुयोग जोशी) : गुलशनाबाद अर्थात उद्यान, फुलांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या आल्हाददायक पोषक वातावरणात फुललेल्या विविध प्रजातींच्या फुलांचे प्रदर्शन ‘पुष्पोत्सव’ची पहिल्याच दिवशी नाशिककरांना भूरळ घातली. शुक्रवारी या प्रदर्शनाचे उदघाटन सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिने गायलेल्या ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गीताने उपस्थितांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, मनपा आयुक्त डॉ. विजय करंजकर, अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील, पाणीपुरवठा अधिकारी संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, स्थायीचे माजी सभापती सुरेश पाटील आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चाैधरी यांनी पुष्पोत्सव घेण्याबाबतचा उद्देश सांगितला. सूत्रसचलन मिलिंद राजगुरू, योगेश कमोद यांनी केले. आभार नाना साळवे यांनी केले. सायंकाळी स्वरसंगीत हा कार्यक्रम रंगला. यावेळी गायकांनी विविध गाणी सादर केली.
प्रथम विजेत्यांना बक्षिसे
सर्वेात्कृष्ट नर्सरी : पपाया नर्सरी, कुंड्यांची शोभिवंत रचान : प्रसाद नर्सरी, सर्वेावम बोन्साय : विनायक शिवाजी शिंदे, ताज्या फुलांची रचना : स्वप्नाली जडे, जपानी पुष्परचना : स्वप्नाली जडे, पुष्प रांगोळी : पंकजा जोशी, सर्वात्तम परिसर प्रतिकृती : प्रसाद नर्सरी, सर्वात्कृष्ठ तबक उद्यान : ज्योती अरूण पाटील, परिसर कृतीमध्ये नाशिक पूर्व विभाग प्रथम, गुलाबराणी : माधुरी हेमंत धात्रक, गुलाब राजा : आरूष सोनू काठे या सर्व प्रथम विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारतोषिके देण्यात आली.
केतकीचे ‘मला वेड लागले प्रेमाचे’
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेली केतकी माटेगावकर हिने ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गीत गात साऱ्यांचीच वाहवा मिळविली. यावेळी केतकी म्हणाली, मला नाशिककरांचे पहिल्यापासून प्रेम मिळाले आहे. मागे शूटिंगच्यावेळी मी महिनाभर नाशिकमध्ये होते, त्यावेळी मला सर्वांनी प्रेम दिले. मुळात शहरच इतकं सुंदर आहे. माझे नाशिकबरोबर वेगळे नाते आहे. यावेळीत तिने तिच्या अल्बमधील ‘ भास हा हवा हवा....भास हा नवा नवा’ हे गीत सादर केले. यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता रवी बागुल यांनी गीत सादर केले.