‘फोल्डिंग सायकल’सोबत नाशिककरांची ‘सेल्फी’
By Admin | Published: March 9, 2017 04:12 PM2017-03-09T16:12:28+5:302017-03-09T16:12:28+5:30
कुतूहल: पंचवटीमधील सायकलप्रेमीने जोपासला छंद
नाशिक : ‘एक व्यक्ती सायकल चालवित येते अन् मध्येच त्या सायकलची घडी करून चक्क बॅगेसारखे घेऊन एका भल्यामोठ्या इमारतीत शिरते’ असा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर बघितला असेल. पण जर असेच चित्र प्रत्यक्ष आपल्याला बघावयास मिळाले तर ...! होय, अशीच सायकल नाशिकच्या रस्त्यावर सध्या फिरत आहे. ‘सेल्फी विथ फोल्डिंग सायकल’चा मोह झाल्याशिवाय राहत नाही. पंचवटीच्या एका सायकलप्रेमी युवकाची ही घडी होणारी सायकल सध्या शहरात आकर्षणाचा विषय ठरत आहे.
जुन्या पारंपरिक सायकलपासून तर आजच्या आधुनिक गिअरची सायकल सर्वांनाच परिचित आहे; मात्र शहरातील पंचवटी भागातील सायकलप्रेमीने चक्क घडी होणारी सायकल परदेशातून खरेदी करत आपला छंद जोपासला आहे. सायकलप्रेमींचे शहर म्हणून राज्यात ओळख मिळविण्याचा प्रयत्न नाशिक शहराने सुरू केला आहे. कृषिनगरमध्ये सायकल सर्कलचे वाहतूक बेटही बघावयास मिळते. आबालवृद्ध सकाळ-संध्याकाळ शहराच्या विविध भागांमधून सायकलवर फेरफटका मारताना दिसून येतात. स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्याबरोबरच शहराचे पर्यावरणही जपण्यासाठी सायकलप्रेमी प्रयत्नशील आहे. असाच प्रयत्न पंचवटीच्या सरदार चौकात राहणाऱ्या विवेक रोजेकर या तरुणाने वजनाला हलकी व घरात सहजरीत्या कमी जागेत ठेवता येईल, अशी घडी होणारी सायकल खरेदी के ली आहे. या सायकलवरून रोजेकर सकाळ - संध्याकाळ फेरफटका मारतात. दिवसभरातून सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास हा छंदवेडा सायकलप्रेमी करतो. मागील दीड ते दोन वर्षांपासून या छंदवेड्याने सायकल चालविण्याचा छंद निष्ठेने जोपासला असून, काही महिन्यांपूर्वीच फोल्डिंग सायकलवरून हा युवक सायकलिंग करत आहे.