‘नो हॉर्न डे’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
By admin | Published: April 11, 2017 01:22 AM2017-04-11T01:22:44+5:302017-04-11T01:23:22+5:30
नाशिक :शहरात केल्या जाणाऱ्या ध्वनिप्रदूषणास आळा बसावा, सोमवार हा ‘नो हॉर्न डे’ म्हणून साजरा केला जावा, या पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेला वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला़
नाशिक : विनाकारण हॉर्न वाजवून शहरात केल्या जाणाऱ्या ध्वनिप्रदूषणास आळा बसावा, तसेच आठवड्याची सुरुवात अर्थात सोमवार हा ‘नो हॉर्न डे’ म्हणून साजरा केला जावा, या पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेला नाशिकमधील वाहनचालकांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला़ विशेष म्हणजे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून हॉर्न न वाजण्याच्या सूचनांबरोबरच हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीचालकांना गुलाबपुष्प व आभारपत्र देत वाहनचालकांचे कौतुकही करीत होते़ जगातील बहुतांशी प्रगत देशांमधील वाहनचालकांकडून हॉर्नचा फारसा वापर केला जात नाही़ मात्र, आपल्याकडे आवश्यकता नसतानाही वाहनांना सर्रास अधिक क्षमतेचे मोठेमोठे हॉर्न बसवून ते वाजविले जातात़ अचानक वाजविल्या जाणाऱ्या या कर्णकर्कश हॉर्नमुळे वृद्ध नागरिक, लहान मुले, स्त्रिया या घाबरतात व प्रसंगी अपघातही घडतात़ विशेष म्हणजे वाहनचालकांकडून हॉर्न वाजविताना शांतता क्षेत्र तसेच ध्वनी मर्यादेचेही सर्रास उल्लंघन केले जात असल्याने ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते़ पोलीस आयुक्तांनी नाशिककरांना सोमवारी ‘नो हॉर्न डे’चे आवाहन केले होते़ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, डॉ़ राजू भुजबळ यांच्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी यांनी विविध सिग्नल्सवर येऊन वाहनचालकांनी सोमवारी हॉर्न न वाजविण्याबाबत प्रबोधन केले़ यावेळी विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या हातामध्ये ‘ध्वनिप्रदूषणाला घाला आळा, हॉर्नचा वापर टाळा’, ‘आता दर सोमवार-आवाज, गोंगाट सीमापार’ असे जनजागृतीपर फलक होते़ शहरातील विविध ठिकाणचे सिग्नल, प्रमुख रस्ते या ठिकाणी करण्यात आलेल्या या जनजागृती कार्यक्रमात लहान मुले, महिला, नगरसेवक, पोलीस कर्मचारी, वाहनचालक, विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता़ या सर्वांचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी आभार मानून ध्वनिप्रदूषण रोखण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)
नाशिकरोडला जनजागृती उपक्रम
नाशिकरोड : वाहनधारकांनी हॉर्न वाजविण्याची खरोखर आवश्यकता असेल तरच हॉर्न वाजवावा. विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले. नाशिकरोड येथील दत्तमंदिर चौकात सोमवारी ‘नो हॉर्न डे’ साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सिंगल म्हणाले की, शहरात प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे साजरा करण्याचा संकल्प असून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सर्व वाहनधारकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सिंगल यांनी केले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील, प्राचार्य राम कुलकर्णी आदिंनी देखील मार्गदर्शन केले.
प्रतिज्ञांचे वाचन महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केले. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोतदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रमेशचंद्र पांडा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संभाजी मोरूस्कर, आर.डी. धोंगडे, सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, संगीता गायकवाड, रोटरीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, शाम खोले आदिंसह इंग्लिश मीडियम, आरंभ महाविद्यालय, सीबीएस महाविद्यालय आदि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉर्न बजाने की बिमारी...
‘लोकमत’ने सर्वप्रथम बजावली भूमिका
वाहनचालकांच्या विनाकरण हॉर्न वाजविण्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्याहीपेक्षा सारखे हॉर्नचे आवाज ऐकून आरोग्याला अपाय होतो. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजविणे म्हणजे एक आजार आहे. ‘एचबीकेबी म्हणजेच हॉर्न बजाने की बिमारी....’
हीच भूमिका ‘लोकमत’ने यापूर्वी मांडली. हॉर्नचे आवाज केवळ कानावर आणि हृदयावर आघात करीत नाही तर नागरिकांचे सुख हिरावून घेतात. हॉर्नच्या सारख्या दणदणाटामुळे थकवा जाणवतो शिवाय कार्यक्षमता प्रभावित होते. हे सामान्य नागरिकांवरील प्रतिकूल परिणाम. याशिवाय रुग्णालयातील रुग्ण, शालेय विद्यार्थी अशा अनेक शांतता क्षेत्रातील घटकांच्या आरोग्यावर यापेक्षा गंभीर परिणाम होतात. विनाकारण हॉर्न वाजविण्यामुळे रहदारी अविश्वसनीय बनते आणि त्यातून चिडचिड वाढते. त्यामुळे मुळात अकारण हॉर्न वाजवूच नका, यासाठी लोकमतने २०१२ मध्ये ‘एचबीकेबी’ ही मोहीम राबविली. आता नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाने यात पुढाकार घेतला आहे. त्यातून आणखी जनप्रबोधन वाढून हॉर्न वाजविण्याच्या बिमारीतून वाहनचालक मुक्त व्हावे ही अपेक्षा !