...अखेर ४३० शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 09:08 PM2018-02-21T21:08:25+5:302018-02-21T21:11:46+5:30
स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र अजूनही प्रलंबित आहे.
सन २००५ नंतर शिक्षक म्हणून असलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे गटशिक्षण स्तरावरच स्थायित्व प्रमाणपत्राची प्रकरणे पडून आहेत. बदलीच्या मागणीसाठी आॅफलाइन प्रकरणे सादर करीत असताना स्थायित्व प्रमाणपत्राची अडचण निर्माण होत नव्हती; परंतु बदलीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना स्थायित्व प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे त्यांचे अर्ज दाखल होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थायित्व प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते.
या प्रस्तावाची फाइल शिक्षणाधिकाऱ्यानी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ठेवली होती, तर आंतरजिल्हा बदलीचे अर्ज दाखल करण्याची तारीखही २१ फेब्रुवारी अंतिम असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी केल्याने ४३० शिक्षकांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--इन्फो--
काही तालुक्यांमधील शिक्षक वंचित
४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असले तरी यातून नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, मालेगाव येथील शिक्षकांना मात्र स्थायित्व प्रमाणपत्र मिळू शकले नाही. तेथील गट शिक्षणाधिकाऱ्यानी प्रस्तावच सादर केले नसल्यामुळे या तालुक्यांतील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.