लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:38 PM2021-06-24T16:38:42+5:302021-06-24T16:42:19+5:30
केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासनाकडून दक्षता घेतली जात असतानाच डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी देखील गाफील न राहाता त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही करावी, असेदेखील भुजबळ यांनी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव मनपाचे आयुक्त भालचंद्र गोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गर्दीमुळे डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी संचारबंदीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करण्यात यावी, डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव हा गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने पर्यटनस्थळी व इतर ठिकाणीदेखील विनाकारण गर्दी टाळण्याची दक्षता नागरिकांनी घेऊन संपूर्ण जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.
पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजन साठ्याबाबत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे, त्याचप्रमाणे रुग्णालयात बेड्सची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.