ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी १६२ कोटी रुपये थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:54 PM2018-03-27T18:54:00+5:302018-03-27T18:54:00+5:30
नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदीपांचे वीजदेयके भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
नाशिक : नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदीपांचे वीजदेयके भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फेब्रुवारी अखेरीस एका पत्रान्वये राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांच्या थकीत देयकांबाबत निर्देश दिले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी वीजबिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर थकीत बिलांसाठी महावितरण विद्युत कंपनी वीजजोडणी खंडित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकीत बिले भागविण्यात यावी व त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात यावी, असे या पत्रात निर्देशित करण्यात आले आहे.
नाशिक मंडळातील ग्रामपंचायतीकडे पथदीपांच्या वीजदेयकापोटी एक हजार ७२० वीजजोडण्यांचे ५३ कोटी ७८ लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वाधिक नाशिक ग्रामीण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या ९९८ वीजजोडण्यांचे ३८ कोटी ७१ लाख रुपये, नाशिक शहर विभाग-दोनमध्ये ३८४ वीजजोडण्यांचे दोन कोटी २२ लाख रुपये, चांदवड विभागात ३३८ वीजजोडण्यांचे १२ कोटी ८४ लाख रुपये थकीत वीजदेयके आहेत.
--इन्फो---
मालेगाव मंडळातील थकबाकी
मालेगाव मंडळातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी एक हजार २१ वीजजोडण्यांचे २३ कोटी ३२ लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वाधिक कळवण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या २५६ वीजजोडण्यांचे सात कोटी २६ लाख रुपये, मनमाड विभागात २७१ वीजजोडण्यांचे पाच कोटी ७९ लाख रुपये, मालेगाव विभागात २६६ वीजजोडण्यांचे पाच कोटी ५९ लाख रुपये, सटाणा विभागात २२८ वीजजोडण्यांचे चार कोटी ७९ लाख रुपये चालू व थकीत वीजदेयके आहेत.