मखमलाबादला समाजकंटकांनी चार दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:41 PM2018-07-15T17:41:57+5:302018-07-15T17:46:16+5:30
नाशिक : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण समोर आलेले नसून परिसरात दहशत पसरविणे वा अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ या घटनेमुळे सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील रहिवासी विजय भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील सभासदांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि़१५) नेहेमीप्रमाणे आपल्या दुचाकी उभ्या केलेल्या होत्या़ मध्यरात्री सुमारे दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास परिसरातील काही अज्ञात समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने पार्किंगमध्ये लावलेली भामरे यांच्या मालकीची प्लेटिना ( एमएच १५, एफके ९४१५), शारदा बुरकुले यांची हिरोहोंडा पॅशन (एमएच १५, डीडी ०११०), संतोष मोरे यांची प्लेजर (एमएच १५, डीक्यू ९४२२) तसेच सुरेश मोरे यांची एम ८० (एमएच १५, एक्स ३५१०) या चार दुचाकींना आग लावली़ इमारतीत काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने नागरिक जागे झाले व त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली़
पंचवटी अग्निशमन दलाचे जवान हे बंबासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत तीन दुचाकी या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, दुचाकीमालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळ परिसरात वाहनांच्या काचा फोडणे तसेच जाळपोळ केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मखमलाबाद शिवारात पुन्हा अशाप्रकारे चार दुचाकींची जाळपोळ केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़