नाशिक जिल्ह्यात अडीच हजार बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:11 PM2018-03-15T22:11:24+5:302018-03-15T22:12:10+5:30
नाशिक : कुपोेषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योचना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सुमारे अडीच हजार इतके असल्याची धक्कादायम माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ इतकी असून मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०४२ इतकी आहे. या बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे आदेश महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी पूरक पोषण आहार खरेदीबाबत गेल्या दोन वर्षांपासून दिरंगाई झाल्याने आणि अद्यापही मागणी नोंदविण्यात आली नसल्यामुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. सभापती अर्पणा खोसकर यांनी बोलविलेल्या सभेत या संदर्भातील आढावा घेतल्यानंतर कुपोषित बालकांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरसूल, इगतपुरी, बागलाण, येवला या तालुक्यांमध्ये गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. बालकल्याण समिती सभेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी आरोग्यविषयक कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी कुपोषित बालकांची माहिती सांगितली. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ अखेर मध्यम गंभीर कुपोषित बालके २०४२ व तीव्र गंभीर कुपोषित बालके ६२९ असल्याची माहिती दिली. शासनाकडून आरोग्यविषयक सुविधा व पूरक पोषण आहारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे यावरून दिसून येते, असे खोसकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी गांभिर्याने कामकाज करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्प स्तरावर लोकवर्गणी व लोकसहभागातून ग्रामविकास केंद्र सुरू करावेत, असे आदेश खोसकर यांनी यावेळी दिले. या केंद्रात बालकांना आणून त्यांच्यावर उपचार आणि आहाराची काळजी घेण्याच्या सूचना खोसकर यांनी दिल्या. नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचे खोसकर यांनी यावेळी सांगितले.