मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 07:20 PM2018-07-29T19:20:14+5:302018-07-29T19:22:48+5:30
नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे याची काहीही स्पष्टता नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता मराठा आरक्षणाकडे सकार गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांची भूमिका कळत नसल्याचे म्हटले. सरकारने अगोदर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. आरक्षण देण्याची तयारी असल्याचे सरकार म्हणत असले तरी हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेले विधान असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
कोणत्या निकषावर आरक्षण देता येऊ शकते, याबाबत मराठा कार्यकर्त्यांचा विश्वास हा मराठा नेत्यांवर आहे. त्यामुळे इतर कुणी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही. कुणी अशी भूमिका मांडली तर त्यावर लागलीच ‘रियॅक्शन’ येऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन समोर मांडलेला ‘मागासलेपण’ यावरूनच पुढे आरक्षणाची रेघ ओढता येऊ शकते, असा बचावात्मक पवित्रा घेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी आहे, अशा शब्दात राजीनामा नाट्यावर टीका केली तर आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
--इन्फो--
शरद पवार यांचे विधान खूष करण्यासाठी
राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. परंतु घटनेत नेमकी कोणती दुरुस्ती करावी, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर त्यावर चर्चा होऊ शकली असती अन्यथा मराठा समाजाला खूष करण्यासाठीचे विधान एवढाच त्याचा अर्थ काढता येऊ शकतो, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.