मुलांनो सावधान! तोतया वधू येत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:28 PM2018-01-15T21:28:22+5:302018-01-15T21:32:08+5:30
नाशिक : मुलीला आई-वडील नाहीत, आम्ही मावशी-काकाच तिचे आईवडील, मुलीला पदरात घ्या, फार नाही दोन लाख द्या, लग्न साधेपद्धतीनेच करू, आमचे फार नातेवाईक नाहीत, असे म्हणून जर तुम्हाला मुलगी सांगून आली असेल तर सावधान!
नाशिक : मुलीला आई-वडील नाहीत, आम्ही मावशी-काकाच तिचे आईवडील, मुलीला पदरात घ्या, फार नाही दोन लाख द्या, लग्न साधेपद्धतीनेच करू, आमचे फार नातेवाईक नाहीत, असे म्हणून जर तुम्हाला मुलगी सांगून आली असेल तर सावधान!
कारण हे स्थळ नसून तुम्हाला लुटण्यासाठी आलेली तोतया वधूची टोळी आहे.
इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये दोन ठिकाणी अशाप्रकारे वरपक्षाची फसवणूक करून या टोळीने पोबारा केला आहे. घोटी आणि देवळाली कॅम्प पोलिसांत याप्रकरणाची नोंद होऊनही पोलिसांना तोतया वधूमंडळींचा शोध घेता आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात मध्यस्थी करणारा मुलाच्या नातेवाइकांच्या हाती लागूनही तो कऱ्हाड मधून मोठ्या शिताफीने पळून गेल्याचे बोलले जात आहे. अर्थात पोलीस दफ्तरी याप्रकरणाची केवळ तक्रार दाखल असल्याने पोलीसही याप्रकरणाकडे फारसे गांभिर्याने पाहत नाहीत. परंतु जे काही घडले त्यावरून प्रकरण सोपे नक्कीच नाही.
समाजातील काही घटकांमध्ये वधू मिळणे कठीण झाल्याने सांगून आलेली मुलगी म्हणजे सुवर्णसंधीच असते. त्यामुळे वधूपक्षाच्या सर्व अटी मान्य करून शिवाय रोख रक्कम देऊन मुलाकडील मंडळी लग्नासाठी तयार होतात. नेमका हाच धागा पकडून तोतया वधूमंडळींनी इगतपुरी तालुक्यात दोन गावांमध्ये महिनाभराच्या अंतराने दोन कुटुंबीयांना चुना लावला आहे.
पहिली घटना तालुक्यातील एका गावात घडली. एका मध्यस्थामार्फत आलेल्या स्थळाने वरीलप्रमाणे कहाणी कथन करून एका कुटुंबात मुलीचे लग्न जमविले. मुलगी मिळाली म्हणून त्यांनीही मुलीकडील म्हणतील तसे करीत जवळच्याच एका मंदिरात लग्नही उरकले. लग्नात ठरल्याप्रमाणे मुलीच्या मावशीने दीड लाख रुपये दिले. रीतीरिवाजाप्रमाणे मोजक्याच वऱ्हाडीच्या उपस्थितीत लग्न पार पडले आणि मुलगी मुलाच्या घरीही आली. मुलीच्या मावशीने सांगितल्याप्रमाणे दुसºया दिवशी सर्वजण शिर्डीला दर्शनासाठी गेले. मावशीही शिर्डीत आली. दर्शन झाले, गप्पाटप्पा, जेवणखाण झाल्यानंतर मावशी आणि मुलगी काहीतरी वस्तू आणण्यासाठी दुकानात जातो असे म्हणून गेल्या त्या पुन्हा परतल्याच नाहीत. मुलाकडील मंडळींनी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उलट पलीकडून शिव्यांची लाखोली वाहण्यात येऊन रॉँग नंबर असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. दुसरी घटनाही जवळच्याच गावात घडली आणि त्यांचीही दोन लाखांची फसवणूक झाली आहे. हे दोन्ही कुटूंबे आता त्या तोतया वधुचा शोध घेत आहेत.